“भूखंड घोटाळा : आरोपी बहीण-भावाला तीन दिवसांची पोलिस कोठडी, खरेदीदार अस्वस्थ”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क , गडचिरोली जूलै १०:
शहरातील भूखंड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या बहीण-भावाची मंगळवारी पोलिस कोठडीत रवानगी झाली. न्यायालयाने त्यांना ११ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, अशी माहिती पो. नि. अरुण फेगडे यांनी दिली.
शहरातील सोनापूर येथील सर्व्हे क्र. १८ /१ मधील ०.५१.५९ हेक्टर आर जमीन सुरेश नानाजी नैताम व इतर सामाईक शेतमालकांकडून खरेदीचा सौदा भुसारे यांच्यासह जयश्री चंद्रिकापुरे व विशालकुमार निकोसे यांनी मिळून केला होता. यासाठी नागनाथ भुसारे व मनोज सुचक यांच्याकडून पैसे घेतले होते.
मात्र, नंतर या दोघांचे बनावट संमतीपत्र बनवून परस्पर नगररचना विभागातून एनए मिळवून भूखंड विक्रीस सुरुवात केली. नागनाथ भुसारे यांच्या फिर्यादीवरून ४ जुलै रोजी जयश्री आनंद चंद्रिकापुरे (रा. गडचिरोली) व विशालकुमार चंद्रकांत निकोसे (रा. गडचिरोली, ह.मु. हिंगणा, ता. नागपूर) या बहीण-भावांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला.
खरेदीदार अस्वस्थ• सोनापूर येथील सव्हें क्र. १८/१ मध्ये भूखंड खरेदी करणारे या गुन्ह्यामुळे अडचणीत आले आहेत. नगररचना विभागातील कोणते अधिकारी, कर्मचारी या भावंडांचे पाठीराखे आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तपास यंत्रणा त्यांच्यापर्यंत पोहोचणार का, हे यथावकाश कळेलच.