युवकाची गळफास घेवून राहत्याघरी आत्महत्या; पोलीस होण्याचे स्वप्न अधूरे”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क; गडचिरोली, जूलै १०:
पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवकाने घराच्या माळ्यावरील फाट्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्याच्या मरेगाव येथे ८ जुलै रोजी दुपारी ४ वाजता उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण अस्पष्ट आहे.
राहुल चंद्रशेखर आत्राम (२२, रा. मरेगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. राहुल हा पोलिस भरतीची तयारी करीत होता. नुकतेच त्याने मैदानी व शारीरिक चाचणी सुद्धा दिली होती. यात त्याला चांगले गुण सुद्धा मिळाले होते. तो चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या एका नातेवाइकाकडे गेला होता. मागील आठवड्यातच तो परतला होता. तेव्हापासूनच नैराश्यात तो होता. सोमवारी सकाळीच त्याची आई शेतावर गेली, तर वडील हे येथे कार्यालयीन गडचिरोली कामासाठी गेले होते. घरी राहुल व त्याचा लहान भाऊ साहील (१९) हे दोघेच होते.
राहुल हा नेहमीप्रमाणे अभ्यास करण्याच्या ठिकाणी म्हणजेच घराच्या माळ्यावर गेला. दुपारी ४ वाजता आई घरी आली तेव्हा राहुलने दोरीने गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांची पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.