“युवकाला सर्पदंश; प्रकृती गंभीर”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क ; जुलै १७; (गडचिरोली) : बहिणीला भेटण्यासाठी गडचिरोली येथे आलेल्या युवकाला मंगळवारच्या रात्री सर्पदंश झाला. सदर युवकावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव रमेश गोल्डे (२६, रा. कोळंबा) ता. नांदुरा, जि. बुलढाणा असे सर्पदंश झालेल्या युवकाचे नाव आहे. गौरवची बहीण गडचिरोली येथे राहते. बहिणीला भेटण्यासाठी तो गडचिरोली येथे आला होता. दरम्यान, मंगळवारच्या रात्री तो बहिणीच्या कुटुंबासह जमिनीवर झोपला. दरम्यान, त्याला सापाने दंश केला. रात्रीच त्याचे पोट दुखण्यास सुरुवात झाली. मात्र असेच असावे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. पहाटेला पुन्हा छातीत दुखण्यास सुरूवात झाल्यानंतर त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तपासणी केल्यानंतर त्याला सर्पदंश झाल्याचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती गंभीर आहे. अन्नाच्या शोधता मन्यार साप बाहेर निघते. जमिनीवर झोपलेल्यांना सदर साप चावल्याच्या घटना घडतात. साप चावल्यानंतर अनेक तास लक्षातच येत नाही.