April 26, 2025

“कोटगल बॅरेज येथील ७० व पारडी येथील १९ नागरिक सुरक्षित स्थळी स्थलांतरित”

  • *कोटगल बॅरेज व पारडी परिसरातील पूरपीडितांचे स्थानांतरण*
    *जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीला*
    *शासकीय शेल्टर होम सुसज्ज*
    *सोमवारी शाळेला सुट्टी*

गडचिरोली, जुलै २१ : जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे कोटगल बॅरेज येथील 70 नागरिकांना व पारडी येथील 19 नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. शासनाद्वारे जिल्ह्यातील विविध भागात सुसज्ज शेल्टर होम तयार असून आवश्यकतेनुसार या शेल्टर होम मध्ये नागरिकांनी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीला असून पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरीत करण्यात येत आहे. शेल्टर होम मध्ये नागरिकांकरिता राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. शेल्टर होम व्यवस्थापन, बाधित रस्ते/पुल, बॅरेकेडींग, पर्यंटन, कम्युनिकेशन प्लॅन, बचाव पथके, संसाधन सुसज्जता, राशन व औषध उपलब्धता, विशेषतः गर्भवती मातांची काळजी इत्यादी संदर्भाने दक्षता घेण्याबाबत यंत्रणेला निर्देश देण्यात आले असून मागील 72 तासात पावसामुळे झालेल्या घरांचे नुकसान तसेच शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दैने यांनी दिले आहेत.दरम्यान मौजा कोंढाळा, ता. देसाईगंज येथील कु. वंश विजय भुते, वय ८ वर्षे या बालकांचा घराजवळील तलावात बुडून मृत्यु झाला आहे.बचाव कार्यासाठी सिरोंचा, भामरागड व गडचिरोली या तालुक्याच्या ठिकाणी एसडीआरएफ च्या प्रत्येक एक असे ३ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

गडचिरोली मुख्यालयी रात्रौ ८ ते पहाटे ३ पर्यंत १९८ मि.मी. एवढे मुसळधार अतिवृष्टी झाली आहे. सायंकाळपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाण्याचा निचरा झालेला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भामरागड तालुका मुख्यालयी पर्लकोटाचे पाणी सध्या ओसरणे सुरु आहे. स्थानिक नागरिकांना यापूर्वीच एसएमएस, दवंडी, पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे संभाव्य पूरपरिस्थितीबाबत अलर्ट देण्यात आले आहे.
नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच विनाकारण बाहेर पडू नये, पुलावरून पाणी वाहत असताना पुढे जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

*सोमवारी शाळेला सुट्टी*

मागील ३ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार
पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही
वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने ३७ मार्ग बंद आहे. शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरु असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी
प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र, यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था,
औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये
दिनांक २२ जुलै, २०२४, सोमवार रोजी सुट्टी जाहीर करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे

About The Author

You may have missed

error: Content is protected !!