December 23, 2024

“नक्षलसप्ताहच्या पूर्वसंधेला जहाल नक्षलवादी कमांडर ललिताचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण; २००६ पासून नक्षल चळवळीत होती सक्रिय”

1 min read

नक्षल चळवळीला मोठा धक्का….. ललितावर चकमक व खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता.”

गडचिरोली न्यूज़ नेटवर्क ; जुलै २७: नक्षलवाद्यांना साहित्य पुरवठा करणारी जहाल नक्षलवादी व कमांडर रिना बोर्रा नरोटे उर्फ ललिता (३६,रा.बोटनफुंडी ता. भामरागड) हिने २७ जुलै रोजी जिल्हा पोलीस व राज्य राखीव पोलीस दलापुढे आत्मसमर्पण केले. तिच्यावर शासनाचे आठ लाखांचे बक्षीस होते. २८ जुलै रोजीपासून नक्षल्यांचा सप्ताह सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर कमांडर रिनाच्या आत्मसमर्पणाने नक्षलवादी चळवळीला धक्का बसला आहे.

रिना नरोटे ही २००६ मध्ये पेरमिली दलममध्ये भरती झाली होती. २००७ पासून ती पुरवठा टीममध्ये काम करायची. २००७ ते २००८ मध्ये शिवणकला, कापड कटिंग व शिलाई यंत्र चालविण्याचे प्रशिक्षण तिने घेतले. २००८ ते २०१४ या दरम्यान टेलरिंग टीममध्ये सदस्य पदावर ती कार्यरत होती. २०१४ मध्ये टेलर टीममध्ये कमांडर पदावर तिची बढती झाली.

या कार्यकाळात तिच्यावर चकमक व खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०२० मध्ये पेरमिली भट्टी जंगल परिसरात झालेल्या चकमकीमध्ये तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. त्याआधी २०१९ मध्ये नैनवाडी जंगल परिसरात एका निरपराध व्यक्तीच्या खुनात ती सामील होती. विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सीआरपीएफ बटालियन ९ चे कमांडंट शंभू कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मसपर्मण पार पडले.

साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार

रिना नरोटे या महिला नक्षलवाद्याच्या अटकेवर आठ लाखांचे शासनाचे बक्षीस होते. आत्मसमर्पणानंतर आता तिला साडेपाच लाखांचे बक्षीस मिळणार आहे. २०२२ पासून आतापर्यंत एकूण २३ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

नक्षलवादी अस्वस्थ?

गडचिरोली पोलिसांच्या प्रभावी नक्षलविरोधी अभियानामुळे मागील दोन वर्षांत २३ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. शिवाय काही जहाल नक्षल्यांना चकमकीत पोलिसांच्या गोळीचा निशाणा व्हावे लागले. त्यामुळे जिल्ह्यात नक्षल चळवळीची पिछेहाट सुरू आहे. मागील महिन्यात नक्षल नेता नांगसू मनकू तुमरेटी ऊर्फ गिरीधर ऊर्फ बिच्छु याने पत्नी संगीता ऊर्फ ललिता चैतू उसेंडी या दोघांनी आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. गिरीधर हा कंपनी १० चा प्रमुख होता. त्यामुळे या दलममध्ये अस्वस्थता पसरल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी वांडोली येथे झालेल्या चकमकीत तीन मोठ्या नेत्यांसह १२ जहाल नक्षलवादी ठार झाले होते. त्यानंतर उत्तर गडचिरोलीत नक्षल चळवळ संपुष्टात आल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्यामुळे अनेक नक्षल नेते अस्वस्थ असून येणाऱ्या काळात आणखी काही नक्षलवादी आत्मसमर्पण करू शकतात.

About The Author

error: Content is protected !!