“भामरागड तालुक्यात ४० वर्षीय इसमाची हत्या;नक्षल्यांनीच हत्या केल्याची परिसरात चर्चा”
1 min read
“आठवडाभरातच भामरागड तालुक्यात ही दुसरी घटना”
गडचिरोली: २८ जुलै ते ३ ऑगस्टपर्यंत नक्षल्यांचा शहीद सप्ताह सुरू आहे. या सप्ताह दरम्यान भामरागड तालुक्यातील एका दुर्गम गावात आणखी एका ४० वर्षीय इसमाची हत्या झाल्याची घटना आज ३१ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.लालू मालू धुर्वा रा. मीरगुडवंचा ता.भामरागड असे त्या हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार भामरागड तालुका मुख्यालयावरून जवळपास १२ ते १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या मिरगुडवंचा येथील लालू मालू धुर्वा यांची ३० जुलै रोजी रात्रीच्या सुमारास हत्या करण्यात आली आहे.सदर गाव हे अतिदुर्गम भागात असल्याने नेमकं हत्या कुणी आणि कुठल्या कारणास्तव केली याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. मात्र, नक्षल्यांनीच हत्या केल्याची परिसरात चर्चा आहे.
या घटनेबाबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दुजोरा दिला असून सदर व्यक्ती पोलिसांचा नातेवाईक असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळेच कदाचित नक्षल्यांनी सदर इसमाची हत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
नुकतेच नक्षल्यांच्या शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर २५ जुलै रोजी भामरागड तालुक्यातील आरेवाडा येथे जयराम कोमटी गावडे ४० वर्षीय इसमाचे नक्षलवाद्यांनी बंदुकीच्या गोळीने हत्या केली. ही घटना २६ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली होती.आठवडाभरातच भामरागड तालुक्यात ही दुसरी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.