१० वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले नाही – माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा पत्रपरिषदेत आरोप
1 min readगडचिरोली न्यूज़ नेटवर्क; ऑगस्ट ०५:(प्रतिनिधी) : आरमोरी तालुक्यात गेल्या १० वर्षांत अनेक समस्या निर्माण झाल्या. त्या सोडविण्यासठी लोकप्रतिनिधी व शासनाने प्रयत्न केले नाही. शेतकरी व सर्वसामान्य जनता ही लोकप्रतिनिधी आणि शासनाच्या धोरणामुळे त्रस्त आहे, १० वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले नाही. असा आरोप माजी आ. आनंदराव गेडाम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केला. येथील पत्रकार परिषदेत पुढे बोलताना आनंदराव गेडाम म्हणाले, की शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सिंचनाच्या मोठ्या प्रमाणात सुविधा व्हाव्यात, यासाठी आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव, डोंगरगाव उपसा जलसिंचन योजना आपल्या काळात २० कोटी ५० लाख रुपयांची मंजूर करून आणली. आपल्या काळात सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात झाली. मात्र १० वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही सिंचन योजनेचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे हजारो शेतकरी आजही सिंचनापासून वंचित आहेत. मात्र याकडे स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. तालुक्यातील कोसरी सिंचन प्रकल्प सुद्धा आपल्या काळात मंजूर झाला. मात्र त्यातही अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी कॅनालचे जे काम व्हायला पाहिजे ते करण्यात आले नाही. त्यामुळे पुराचे पाणी नाल्याला आल्यास ते शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या प्रकल्पाकडे लक्ष देऊन अधिकाऱ्यांकडून काम पुर्ण करवून घेणे हे स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदाराचे काम आहे. मात्र गेल्या दहा वर्षात ते झाल्याचे दिसत नाही. लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर अंकुश नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले.
तालुक्यात घरगुती, कृषिपंपाच्या विजेच्या समस्या मोठ्या आहेत. मात्र चार वर्षांचा कालावधी लोटूनही अद्यापही त्या शेतकऱ्यांना विजेची जोडणी करून देण्यात आली नाही. या जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः ऊर्जामंत्री असतानाही ही समस्या निकाली न निघणे हे शासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्दैव असल्याचे गेडाम म्हणाले. गोदाम निर्मिती, रामसागर तलाव सौंदर्गीकरण, रवी मुलुरचक गावाचे समायोजन, शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न असून स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप गेडाम यांनी केला. सदर पत्रकार परिषदेला आनंदराव आकरे माजी जिल्हा परिषद सभापती, विश्वास भोवते सर, माजी सभापती जिल्हा परिषद, मिलींद खोब्रागडे अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी आरमोरी, दिलीप घोडाम उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी,शालीक पत्रे शहर काँग्रेस अध्यक्ष,लारेन्स गेडाम, दत्तु सोमनकर, चिंतामण ढवळे, भोलेनाथ धानोरकर, काशिनाथ पोटफोडे, सारंग जांभुळे,हिवराज बोरकर, अनिल किरमे, बेबीताई सोरते, मडावीताई,छोटुसींग,व साबिर शेख उपस्थित होते.