“ठाणेगाव येथे जबरी चोरी करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात; एक फरार”

गडचिरोली न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०७ (आरमोरी): शहरापासून तीन किलोमीटरवरील ठाणेगाव येथे सेवानिवृत्त परिचारिकेला धमकावत खुर्चीला बांधून दागिने व रोख रक्कम असा चार लाखांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपींचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. ६ ऑगस्टला दोघांना जेरबंद केले असून एक फरार आहे.
अंकित भीमराव लटारे (वय २४, रा. ठाणेगाव), प्रशांत विलास राऊत (वय २२, रा. रामाळा) अशी अटकेतील आरोपींची नावे असून प्रतीक राजू भुरसे (वय २४ रा. ठाणेगाव) हा फरार आहे. या गुन्ह्यात एका विधिसंघर्ष बालकाचाही समावेश आहे. सेवानिवृत्त परिचारिका संपदा नानाजी काळबांधे यांच्या घरात शिरुन १ ऑगस्टला भरदिवसा या चौघांनी धुडगूस घालत त्यांना धमकावले होते, त्यानंतर त्यांना खुर्चीला बांधून ऐवज लांबविला होता. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पो.नि. उल्हास भुसारी यांनी तपासचक्रे गतिमान करुन दोघांना जेरबंद केले. त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.