“कोरची तालुक्यात मालेरीयाचा प्रकोप; एडजाल येथील ४ वर्षीय बालिका दगावली”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०७;(कोरची) : तालुक्यात मलेरियाचा प्रकोप काही थांबायला तयार नाही. गोडरी येथे चिमुकल्या भावंडांचा तर अलोंडीत दीड महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच एडजाल गावात चार वर्षांच्या मुलीने प्राण गमविल्याचे दि. ६ ऑगस्टला समोर आले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. शिवांगी कैलास नैताम (४, रा. एडआल) असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे.
यापूर्वी कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रापासून चार किमी अंतरावर असलेल्या गोडरी येथील प्रमोद अनिल नैताम (४) आणि करिश्मा अनिल नैताम (६) यांचा दि. १० मार्च रोजी मलेरियाने मृत्यू झाला होता. त्यानंतर येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अलोंडी गावातील आरती कुंजाम या दीड महिन्याच्या चिमुकलीचा मलेरियाने मृत्यू झाला होता.
कोटमूलपासून आठ किलोमीटर अंतरावरील एडजाल गावातील शिवांगी नैताम या मुलीला ताप आला होता, नातेवाइकांनी कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, पण तिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला गडचिरोलीतील महिला व बाल रुग्णालयात पाठवले. तेथे उपचारादरम्यान दि. २१ जुलै रोजी पहाटे तिचा मृत्यू झाला. दरम्यान, यापूर्वी तीन बालकांचा मलेरियाने मृत्यू झाला होता. त्यानंतर जि. प. सीईओ आयुषी सिंह यांनी कोटगूल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन अडचणी जाणून घेतल्या होत्या. शिवाय तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.