“जारावंडी-पेंढरी परिसर बनला गोवंश तस्करीचा प्रमुख केंद्र; वन नाके, सीसीटीव्ही कॅमेरे तरी कारवाई होईना”
1 min readगडचिरोली न्यूज नेटवर्क, ऑगस्ट ०७;(धानोरा) तालुका मुख्यालयाच्या भागातील जारावंडी-पेंढरी परिसरात मागील अनेक वर्षांपासून गोवंश तस्करी जोमाने सुरू आहे. या परिसरातील काही गावे गोवंश तस्करीचे प्रमुख केंद्र बनले आहे. शेजारच्या जिल्ह्यातील दलाल या भागात सक्रिय झाले असून येथून लगतच्या जिल्ह्यासह थेट आंध्रप्रदेश, तेलंगणा राज्यात जनावरे कत्तलीसाठी पाठविली जात आहेत. गोवंश तस्करांनी या परिसरात आपले नेटवर्क वाढविले असल्याने या भागातील जनावरे नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.
धानोरा तसेच एटापल्ली तालुक्यांतर्गत येत असलेला जारावंडी- पेंढरी परिसर आदिवासीबहुल असून याचा गैरफायदा गोतस्कर घेताना दिसून येत आहेत. शेती व्यवसायात यांत्रिक उपकरणाचा वापर वाढला असला तरी जारावंडी परिसरात बहुतांश शेतकरी बैल, रेडा यांच्या साहाय्याने शेती करतात. त्यामुळे पशुधनाचे महत्त्व आजही कायम आहे. या परिसरात जनावरांचा विशेष सांभाळ पशुपालक संख्या लक्षणीय आहे. नेमकी हीच बाब हेरून गोतस्करांनी जारावंडी-पेंढरी परिसराला तस्करीचा अड्डा बनवून जनावरांना कत्तलखान्यात पाठवित आहेत.
या भागात जनावरांची मागील काही वर्षांपासून गोवंश तस्करीचा हा प्रकार सुरू आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याची माहिती आहे. प्रशासनाद्वारे अनेकदा कत्तलखान्यात जाणारी जनावरे पकडून जीवदान देण्यात आले आहे. मात्र, जनावरे तस्करीवर आळा घालण्यात पोलिस प्रशासनाला अजूनही यश आल्याचे दिसत नाही.
जारावंडी-पेंढरी परिसरातील काही गावातील जंगलात शेकडो जनावरे गोळा केली जातात. रात्रीच्या वेळी या जनावरांना वाहनात कोंबले जाते. जारावंडी-पेंढरी परिसरातील गावांसह सीमेलगत असलेल्या छत्तीसगड राज्यातील गावातील जनावरे गोळा करून जनावरांची दररोज टेम्पो वा मोठ्या ट्रकमध्ये भरधाव वेगाने वाहतूक केली जात आहे. अत्यंत क्रूरपणे जनावरे वाहनात कोंबली जात असल्याने काही जनावरांचा तडफडून मृत्यू होत आहे.
वननाके, सीसीटीव्ही कॅमेरे तरी कारवाई होईना
गोवंश तस्करीचा हा प्रकार जारावंडी पोलिस ठाणे हद्दीतून होत आहे. या ठाणे हद्दीतील अनेक गावांमधून जनावरांची वाहतूक होत आहे. या वाहतुकीअंतर्गत जारावंडी येथील वनउपज तपासणी नाका असून रस्त्यालगत सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. असे असतानाही जारावंडीसह, पेंढरी, गट्टा, कारवाफा, पोटेगाव, चामोर्शी, गडचिरोलीसमोर चंद्रपूर मार्गाने वाहतूक केली जात आहे. या मार्गावर अनेक पोलिस ठाणे आणि वननाके येतात, परंतु आजपर्यंत या गौतस्करीला पूर्णतः आळा बसला नाही.