December 22, 2024

शहरात शिरला बिबट; देसाईगंज परिसरात भितीचे वातावरण

1 min read

देसाईगंज, ऑगस्ट १३: शहराच्या तुकुम वार्डातील अनिकेत समाजकार्य महाविद्यालया समोरील खुल्या जागेत असलेल्या कचाटात बिबट शिरतांना अनेकांनी पाहिले. याबाबत वडसा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देताच रेस्क्यू टिम शोधार्थ घटनास्थळी दाखल होऊन शोधकामी तळठोकून बसली आहे. मात्र सदर बिबट कचाट्यात दबा धरून बसला असल्याने सायंकाळ उशिरापर्यंतही बिबट्याचा शोध लागला नव्हता.

दरम्यान देसाईगंज शहरात बिबट शिरल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरताच बघ्यांची चांगलीच गर्दी उसळली. शहराच्या तुकुम वार्डातील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयापासुन वडसा वन विभागाचे वनपरिक्षेत्र कार्यालय असुन या कार्यालयाच्या परिसरात तसेच लागुनच असलेल्या वळु माता केंद्राच्या परिसरात नेहमीच बिबट आढळून येतात. त्यामुळे भक्षाच्या मागावर सदर बिबट शहराच्या दिशेने आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान शहरात बिबट शिरल्याची माहिती वडसा वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच बिबट्याला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टिम घटनास्थळी दाखल होऊन सदर बिबट्याचा कसुन शोध घेत आहे. मात्र बिबट दबा धरून बसलेल्या ठिकाणी कचाट असल्याने बिबट्यापर्यंत पोहचण्यास टिमला अडचणींचा सामना करावा लागत आहे. तथापी तब्बल तीन तासापासून मागावर राहुन कसुन शोध घेणे सुरु असले तरी वृत्त लिहिस्तोवर बिबट्याचा शोध

लागला नव्हता. परंतु सदर बिबट्याला कचाटात शिरतांना अनेकांनी पाहिले असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

About The Author

error: Content is protected !!