“कुपोषणावर मात करण्यासाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात बाल उपचार केंद्र सुरु; तालुक्यातील कुपोषण व बालमृत्युचे प्रमाण कमी होणास होईल मदत “
1 min readकोरची, ऑगस्ट १७ : येथील ग्रामीण रुग्णालयात १५ ऑगस्टला बाल उपचार केंद्र सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी केले. यापुर्वी तालुक्यातील कुपोषित बालकांना उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा व महिला रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल केले जात होते. परंतु ही सुविधा ग्रामीण रुग्णालयात सुरू झाल्यामुळे कोरची तालुक्यातील लाभार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल.
सदर केद्रांमध्ये कमी वजनाचे बालकांना विशेष देखरेखीखाली योग्य नियोजन रित्या सकस आहार देऊन त्यांचे वजन वाढविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. सदर बाल उपचार केंद्र सुरु करताना जामनारा येथील बालक माही श्यामराव गुरभेले (वय ३) या तीव्र कुपोषित बालकास भरती करुन उपचार सुरु करण्यात आले आहे.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अभय थुल, वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल राऊत, बाल विकास प्रकल्प अधिकारी अक्षय डोनाडकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका दुर्गे, अंगणवाडी सेविका लता उंदीरवाडे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.
कुपोषण होणाची कारणे
गर्भवती माता गरोदरपणात सकस आहार घेत नसल्यामुळे होणारे अपत्य हे कमी वजनाचे होते. माता जर व्यसन करीत असेल तर होणारे बाळ हे कमी वजनाचे होते. तसेच बालकांना योग्य प्रमाणात सकस आहार प्राप्त न झाल्यास बाळाचे वजन कमी होऊन रोग प्रतिकारक शक्ती कमी होऊन ईतर आजारामुळे त्या बालकाचे वेळप्रसंगी मृत्यु होऊ शकतो.
कुपोषण न होण्यासाठी करावयाची उपाययोजना
गरोदरपणात मातेनी सकस आहार घेणे गरजेचे असुन नियमितपणे औषधौपचार घेणे गरजेचे आहे. याप्रसंगी मातेने व्यसनापासुन दुर राहावे. गरोदरपणात किमान दोन सोनोग्राफी करुन बालकांचे वाढ व विकास योग्य पध्दतीने होत आहे कि नाही यांची खात्री करावे. जेवणात हिरव्या भाजीपाला, अंडी, कडधान्य यांचा समावेश करावा.
कोरची ग्रामीण रूग्णालयात बाल उपचार केंद्रात तिव्र कुपोषित बालकास भरती केल्यास ३०० रुपये प्रमाणे एकुण १४ दिवसांकरिता बालकाच्या पालकास ४२०० बुडित मजुरी बँक खाते मध्ये देण्यात येते. तसेच केंद्रात कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय येथील आहारतज्ञ यांच्यामार्गदर्शनाखाली सकस आहार देण्याचे नियोजन केलेले आहे. सध्या तालुक्यात १५ तिव्र कुपोषित व १४६ मध्यम कुपोषित बालके आहेत. बाल उपचार केंद्र सुरु झाल्यामुळे तालुक्यातील कुपोषण व बालमृत्युचे प्रमाण कमी होणास नक्की मदत होईल. त्यामुळे रुग्णांनी येथे उपचार करावे.
– डॉ. विनोद मडावी, तालुका आरोग्य अधिकारी, कोरची