बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने कर्ज प्रस्ताव मंजुर करावे – तृणाल फुलझेले यांचे आवाहन
1 min readगडचिरोली,(जिमाका)दि.23: गडचिरोली हा आकांक्षित व नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने लाभार्थी निवड, कर्ज मंजुरी व वाटप याकरिता बँक व शासकिय यंत्रणा यांनी समन्वयाने काम करुन उद्दीष्टपूर्ती करावी व त्यासाठी प्रत्येक आठवडयात आढावा बैठक घ्यावी, असे आवाहन जिल्हा विकास प्रबंधक, नाबार्ड, गडचिरोली तृणाल फुलझेले, यांनी केले. जिल्हाधिकारी, संजय मीणा,यांनी जिल्हा कार्यबल समितीमध्ये सुचित केलेप्रमाणे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजने अंतर्गत कर्ज प्रस्ताव करताना आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करणे व ताळेबंद वाचन याविषयीची एक दिवसीय कार्यशाळा आर.सेटी. प्रशिक्षण केंद्र, हॉल बँक ऑफ इंडिया, कॉम्पलेक्स,गडचिरोली येथे दिनांक 19 जानेवारी,2023 रोजी जिल्हा उद्योग केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ व नाबार्ड,गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करणेत आली होती. या कार्यशाळेस जिल्हा बँक समन्वय, महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र व जिल्हा खादी व ग्रामोद्योग मंडळ चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर अतुल पवार, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विक्रांत गेडाम, सहा.प्रबंधक, स्टेट बँक गडचिरोली यांनी प्रकल्प अहवाल करताना प्रामुख्याने वापरणा-या तांत्रिक मुद्यावर सखोल मार्गदर्शन केले व ताळेबंद वाचनाबाबत महत्वाची माहिती सांगीतली. श्री कांबळे, मुख्य व्यवस्थापक (कर्ज) स्टेट बँक यांनी कर्ज मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची माहिती सांगीतली, श्री सोरते सरव्यवस्थापक (कर्ज) गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँक यांनी कर्ज मंजुर करतानाच्या बँकेचे दृष्टीकोण व उद्योजकांनी उत्पादन किंमत निश्चित करताना अंतर्भात करणेच्या मुद्दे याबाबत माहिती दिली. श्री गजानन माद्यसवार, प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक यांनी सकारात्मक दृष्टीकोन व ग्राहक अनुभव याबाबत मार्गदर्शन केले व बँक व जिल्हा उद्योग केंद्र यांच्यामधील समन्वयाबाबत भूमिका मांडली.
त्यानंतर अतुल पवार, महाव्यवस्थापक यांनी ऑन लाईन प्रकल्प अहवाल व कर्ज मागणी अर्ज याबाबत प्रात्यक्षिक दिले. यामध्ये श्री गेडाम, निरीक्षक, खादी ग्रामोद्याग मंडळ यांनी सहाय्य केले. त्यानंतर सचिन देवतळे यांनी योजनेबाबत मार्गदर्शन केले.व उपस्थितांना मान्यवरांचे हस्ते डायरी वाटप करणेत आली. सदर कार्यक्रमाचे संयोजन श्री घुमारे,मेश्राम खेडेकर,टेकाम,गोतमारे,गेडाम यांनी केले होते.व शेवटी महाव्यवस्थापक,जिल्हा उद्योग केंद्र,गडचिरोली यांना सर्व उपस्थितांचे आभार मानले.