April 26, 2025

शहीद जवान महेश नागुलवार यांना शासकीय इतमामात श्रद्धांजली

“सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्याकडून कुटुंबीयांचे सांत्वन”

गडचिरोली, १२ फेब्रुवारी : माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करताना वीरगती प्राप्त झालेले सी-60 कमांडो महेश नागुलवार यांच्यावर आज त्यांच्या गावी, अनखोडा (ता. चामोर्शी), शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी सह पालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व कुटुंबीयांचे सांत्वन केले.

पोलीस पथकाने बंदुकीच्या फैरी झाडून शहीद जवानाला मानवंदना दिली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल आणि इतर मान्यवरांनीही पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

पोलीस मुख्यालयात मानवंदना

तत्पूर्वी, आज सकाळी गडचिरोली पोलीस मुख्यालयातही शहीद महेश नागुलवार यांना पोलीस मानवंदना देण्यात आली. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक (स्पेशल ऑपरेशन) राजकुमार व्हटकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल, तसेच सीआरपीएफचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

नक्षलविरोधी कारवाईत वीरमरण

भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात सी-60 जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती. मात्र, या कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुली असा आप्तपरिवार आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!