शंकरच्या मृत्यूने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

चामोर्शी, २४ मार्च : वज्राघात मुळे मृत्युमुखी झालेल्या शंकरच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. कुटुंबातीलकमावती एकमेव व्यक्ती गेल्याने पत्नी विधवा, दोन मुले अनाथ, तर वृध्द आईवडिल निराधार झाल्याची ही करूण कहाणी आहे.
दोन दिवसापासून हवामान खात्याने वादळी वारा व वज्राघाताचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार शुक्रवारी (दि.21) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास आकाशात पावसाचे ढग जमले. सोबतीला विजांचा कडकडाट सुरू झाला. यादरम्यान चामोर्शी तालुक्यातीलकोनसरीत अचानकपणे वीज कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. गावानजिकच्या उमरीचा शंकर नामक 45 वर्षीय तरुणाचा यावज्राघातात जागीच मृत्यू झाला. त्यामुळे आईवडिलांना मोठा हादरा बसला. त्याची दोन चिमुकली लेकरं अनाथ झाली. कपाळावरीलकुंकू पुसला गेल्याने हादरलेली शंकरची पत्नी कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करू, म्हणून आजही हंबरडा फोडत आहे. चामोर्शीतालुक्यातील कोनसरी जवळील उमरी या गावातील शंकर नागन्ना शिंपतवार याच्या नैसर्गिक मृत्यूने घरातील वडील नागन्ना पोचन्नाशिंपतवार, आई सत्याबाई नागन्ना शिंपतवार, पत्नी मायाबाई शंकर शिंपतवार, मुलगा अविनाश शंकर शिंपतवार, सुनील शंकरशिंपतवार यांच्यावर दुखाचे डोंगर कोसळले आहे. गावात शंकरच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.
कुटुंबाला आर्थिक मदत करा
घटनेची माहिती मिळताच अनखोडा येथील तलाठी सी. डी. नाईक यांनी पंचनामा करून, चामोर्शी येथील तहसील कार्यालयातअहवाल पाठविला. शिंपतवार कुटुंबाचा कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी शासनानेत्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
“कार्यालयाकडून मृतक शंकरच्या कुटुंबियांना नैसर्गीक आपत्ती निधीतून 4 लाखाची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.” – प्रशांत घोरूडे, तहसीलदार, चामोर्शी