लाचखोर वैद्यकीय अधिकारी निलंबित; एसीबीने घेतला 1 दिवसाचा पीसीआर

गडचिरोली, २८ मार्च: आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्याचे रोखलेले पुरवणी पगार बिल काढण्यासाठी चक्क 1 लाख 50 हजार रुपयांचीमागणी करून 1 लाख 30 हजार रुपयांवर तडजोड करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा परिषदेने तडकाफडकी निलंबित केले. त्या जागी दुसऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्तीसुद्धा करण्यात आल्याची माहिती सीईओ सुहास गाडे यांनी दिली.
भामरागड तालुक्यातील लाहेरी या अतिदुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्याडॅा.संभाजी भोकरे यांच्या वैद्यकीय सेवेचे काही महिन्यांपूर्वी कौतुक झाले होते. पण सेवेच्या आड लाचखोरीचा मेवा खाण्याची सवयत्यांच्यासाठी घातक ठरली. कोणतेही ठोस कारण नसताना त्यांनी आरोग्य सहायकाचे पगार बिल रोखले होते. नंतर ते काढण्यासाठीमोठी लाच मागितली. यामुळे वैतागलेल्या त्या कर्मचाऱ्याने एसीबीकडे धाव घेतली.
डॉ. भोकरे याला एसीबीच्या पथकाने गुरूवारी (दि.27) जिल्हा न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने एक दिवसाचा पीसीआरदिला. यात डॉ. भोकरे याने यापूर्वी अशा पद्धतीने लाचखोरी केली का, त्याच्याकडे अनैतिक मार्गाने जमवलेली संपत्ती आहे का, याचीही तपासणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुर्गम भागात जाऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईचेसर्वत्र कौतुक होत असून दुर्गम भागात लाचखोरी करणाऱ्यांना मात्र धडकी भरली आहे.