रेल्वेचा नवा अध्याय: बल्लारशाह-गोंदिया दुहेरीकरणाला हिरवा कंदील

गडचिरोली , ६ एप्रिल : केंद्र सरकारने भारतीय रेल्वेच्या विकासासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, बल्लारशाह–गोंदिया रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. ४ एप्रिल रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, या प्रकल्पासाठी ४,८१९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. पीएम गतिशक्ती योजने अंतर्गत हा प्रकल्प राबवलाजाणार असून, या मुळे महाराष्ट्रातील विदर्भातील रेल्वे वाहतूक अधिक गतिमान आणि सुविधाजनक होणार आहे.
हा रेल्वे मार्ग २४० किलोमीटर लांबीचा असून, तो महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांना जोडणारा आहे. या मध्ये गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. सध्या हा मार्ग एकेरी असल्याने रेल्वे वाहतुकीवर मोठा ताण येत होता. या दुहेरीकरणामुळे विद्यमान रेल्वे ट्रॅकवरील गर्दी कमी होईल आणि मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतूक अधिक सुधारेल. या प्रकल्पामुळे उत्तर भारत आणि पूर्व भारताला दक्षिण भारताशी जोडणारा हा मार्ग आणखी सोयीचा होणार आहे.
या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणामुळे या चारही जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. विशेषतः या भागातील खनिज संपत्ती जसे की कोळसा, मँगनीज आणि पोलाद यांची मालवाहतूक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. या मुळे स्थानिक उद्योगांना फायदा होईल आणि रोजगाराच्या संधीही वाढतील. तसेच, प्रवासी वाहतुकीसाठी अधिक गाड्या उपलब्ध होऊ शकतील, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.
हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्य आणि नवेगाव राष्ट्रीय उद्यानाच्या जवळून जातो. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी करताना पर्यावरण संरक्षणावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे आणि सूचना–प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा प्रकल्प पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण केला जाईल आणि स्थानिक जैवविविधतेचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाईल.
हा प्रकल्प विदर्भाच्या विकासासाठी एक वरदान ठरणार आहे. गोंदिया–बल्लारशाह रेल्वे मार्ग हा विदर्भातील एक महत्त्वाचा दुवा आहे, जो या भागाला देशाच्या इतर भागांशी जोडतो. या दुहेरीकरणामुळे रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढेल आणि या भागातील लोकांना अधिक चांगल्या सुविधा मिळतील. स्थानिक नेते आणि नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
या बैठकीत बल्लारशाह–गोंदिया मार्गाच्या दुहेरीकरणासह एकूण चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत १८,६५८ कोटी रुपये असून, यामुळे भारतीय रेल्वेचे नेटवर्क १,२४७ किलोमीटरने वाढणार आहे. महाराष्ट्रासह ओडिशा आणि छत्तीसगड मधील काही रेल्वे मार्गांचाही यात समावेश आहे.
या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर आता त्याच्या अंमलबजावणीवर भर दिला जाणार आहे. रेल्वे मंत्रालयाने यासाठी एक वेळापत्रकतयार केले असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर विदर्भातील रेल्वे वाहतूक एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास रेल्वे मंत्रालयाने व्यक्त केला आहे.
या निर्णयामुळे विदर्भातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागाचा सर्वांगीण विकास होईल आणि रेल्वे सेवेचा दर्जा आणखी उंचावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.