कुरखेडा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांवर गंभीर आरोप; अतिक्रमणाच्या गोंधळात चौकशीची मागणी तीव्र

गडचिरोली, ९ एप्रिल: कुरखेडा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी पंकज गावंडे यांच्या संशयास्पद कार्यशैलीने नागरिकांचा संताप शिगेला पोहोचला आहे. प्रभाग क्रमांक ९, गांधी वार्डातील १२ मीटर सर्विस रोडवरील अतिक्रमण हटवण्यात सातत्याने दिरंगाई आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक रहिवाशांनी थेट जिल्हाधिकारी अविष्यांत पांडा (भा.प्र.से.) यांच्याकडे धाव घेतली आहे. डॉ. भैयालाल राऊत यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारीत मुख्याधिकाऱ्यांवर कायद्याची पायमल्ली आणि सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली प्रशासन चालवण्याचा थेट आरोप करण्यात आला आहे.
या तक्रारीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. ५ आणि १० मार्च २०२५ रोजी नगरपंचायतीला सादर केलेल्या निवेदनांमध्ये अतिक्रमण हटवून नाली बांधकाम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच, उपविभागीय अधिकारी, कुरखेडा यांनी २० मार्च २०२५ रोजी स्पष्ट आदेश देऊनही मुख्याधिकारी गावंडे यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. उलट, पेट्रोल पंप परिसरातील अतिक्रमण न हटवता तिथले नाली बांधकाम पूर्ण केल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे, ज्यामुळे मुख्याधिकाऱ्यांचा अतिक्रमणधारकांना पाठिंबा असल्याचा संशय बळावला आहे.
“मुख्याधिकारी तक्रारदारांना लक्ष्य करत आहेत आणि अतिक्रमण करणाऱ्यांना दिलासा देत आहेत,” असा गंभीर आरोप डॉ. राऊतयांनी केला. त्यांनी पुढे म्हटले, “अकृषक आदेशात मंजूर १२ मीटर सर्विस रोडवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभे राहिले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी पाठवलेली पत्रे दिशाभूल करणारी आहेत आणि मोजमाप झाल्याचा दावा खोटा आहे. भूमी अभिलेख विभागा शिवाय मोजणीचा अधिकारच त्यांच्याकडे नाही.” रहिवाशांचा असा दावा आहे की, कंत्राटदारानेही अतिक्रमण हटवण्यासाठीतीनदा पत्रव्यवहार केला, पण प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले.
या प्रकरणाने कुरखेडा नगरपंचायतीच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “सांडपाणी आणि रहदारीच्या समस्यांमुळे आम्ही त्रस्त आहोत. प्रशासनाच्या मनमानीमुळे आमचा जीव मेटाकुटीला आला आहे,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली. निवेदनात अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता मोकळा करण्याची आणि मुख्याधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या तक्रारीची प्रत विभागीय आयुक्त, नागपूर यांनाही पाठवण्यात आली असून, आता सर्वांचे लक्ष जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णया कडेलागले आहे. मुख्याधिकारी गावंडे यांच्यावर कठोर कारवाई होणार की हा गोंधळ असाच कायम राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.