१२ एप्रिलला देसाईगंजात जप्त व बेवारस वाहनांचा भव्य लिलाव!

गडचिरोली, ९ एप्रिल : देसाईगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्ह्यांमध्ये जप्त झालेल्या आणि अनेक वर्षांपासून बेवारस अवस्थेतधू ळ खात पडलेल्या वाहनांचा कायदेशीर लिलाव येत्या १२ एप्रिल २०२५ रोजी देसाईगंज येथे होणार आहे. तब्बल १२९ वाहनांची ही विक्री प्रक्रिया नागरिकांसाठी खुली असून, यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या २९ दुचाकी आणि ८ चारचाकी वाहनांसह, बेवारस अवस्थेत आढळलेल्या ७७ दुचाकी आणि १५ चारचाकी वाहनांचा या लिलावात समावेश आहे. या वाहनांचे मूळ मालक शोधण्यात पोलिसांना यश न आल्याने, संबंधित अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून लिलावाला मंजुरी मिळाली आहे.
देसाईगंज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी नागरिकांना लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इच्छुकांनी देसाईगंज पोलीस ठाणे किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. ही संधी वाहन खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अनोखी ठरणार आहे.
लिलावाची ही प्रक्रिया पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने होणार असून, यामुळे पोलीस ठाण्यातील जागाही मोकळी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.