गडचिरोलीत कामगार कार्यालयावर गंभीर आरोप: नोंदणी एकाची, वस्तू दुसऱ्याला; आजाद समाज पक्षाचा टाळे ठोकण्याचा इशारा

गडचिरोली, १० एप्रिल : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत कामगारांना गृहपयोगी वस्तूंचे संच वितरित करण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. नोंदणी एका कामगाराची असते, तर वस्तू दुसऱ्याला मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे कामगारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप आजाद समाज पक्षाने केला असून, दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास कामगार कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी दिला आहे.
गडचिरोली येथील वस्तू वितरण केंद्राला भेट देताना राज बन्सोड यांनी अनेक धक्कादायक बाबी उजेडात आणल्या. अनेक कामगार दोन-दोन दिवस तिथे मुक्काम करूनही त्यांना वस्तू मिळत नाहीत. ठेकेदारांनी वस्तू आधीच उचलल्याचे सांगून कामगारांना रिकाम्या हाती परत पाठवले जात आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या १८ जानेवारी २०२१ च्या आदेशानुसार, वस्तू वितरणावेळी लाभार्थ्यांचे छायाचित्र आणि बायोमेट्रिक ठसे घेणे बंधनकारक आहे. तरीही हे नियम धाब्यावर बसवून वस्तूंची लूट सुरू असल्याचा आरोप बन्सोड यांनी केला. ठेकेदाराने याबाबत विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली, तर काही संचात वस्तू कमी असल्याची तक्रारही कामगारांनी केली.
आजाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कामगार अधिकाऱ्यांनाही जाब विचारला, परंतु त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. “अधिकाऱ्यांचे या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे,” असे राज बन्सोड यांनी सांगितले. पक्षाने दोन दिवसांत चौकशी करून अन्यायग्रस्त कामगारांना न्याय देण्याची आणि प्रलंबित नोंदणी, नूतनीकरण व लाभाच्या प्रकरणांचा त्वरित निपटारा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा कठोर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशारा देण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रभारी विनोद मडावी, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार आणि नागसेन खोब्रागडे उपस्थित होते.
या प्रकरणाने कामगार कल्याण योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.