गडचिरोलीत पुन्हा घोटाळ्याचा भूकंप: देऊळगावनंतर गोठणगाव धान केंद्रावर तपास पथकाची झाडाझडती!

“गोठणगाव धान खरेदी केंद्रावर तपास पथकाची चौकशी; घोटाळ्याचा संशय”
गडचिरोली, १० एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव धान खरेदी केंद्रानंतर आता गोठणगाव धान खरेदी केंद्रही प्रशासनाच्या रडारवर आले आहे. मागील दोन आठवड्यांपासून तपास पथक या केंद्रावर सखोल चौकशी करत असून, येथे ही धान आणि बारदाना खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या या केंद्रावर तपासणी सुरू असल्याने संबंधित पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
देऊळगाव केंद्रावर १ कोटी ५३ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील इतर संशयास्पद केंद्रांचेही तपासणीचे आदेश दिले होते. त्यानुसार गोठणगाव केंद्रावर गेल्या दोन आठवड्यांपासून तपास पथकाने धानाच्या नोंदी, बारदान्यांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठ्याची पडताळणी सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, येथे ही धान आणि बारदान्याच्या संख्येत तफावत असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सांगितले, “देऊळगाव प्रकरणानंतर संशयास्पद केंद्रांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. गोठणगाव केंद्रावर तपास पथकाची चौकशी सुरू असून, गैरव्यवहार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.” त्यांच्या या निर्देशांमुळे घोटाळ्यात सामील असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
देऊळगाव केंद्राच्या घोटाळ्यात कुरखेडा उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक मुरलीधर बावणे अडचणीत सापडले होते. आता गोठणगाव केंद्रावरही तपास पथकाची नजर असल्याने येथील पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. तपास पथकाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच येथील गैरव्यवहाराचा नेमका आकडा स्पष्ट होईल, असे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी धान खरेदी हंगामात कोट्यवधींचे घोटाळे समोर येत असल्याने, यंदा प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्धार केला आहे. गोठणगाव केंद्रावरील चौकशीचा निकाल काय लागतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.