५ दिवस ‘आपले सरकार’ सेवा ठप्प: १० ते १४ एप्रिलदरम्यान अद्ययावतीकरण

गडचिरोली, १० एप्रिल : महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ‘आपले सरकार’ पोर्टलवर नियोजित देखभाल आणि हार्डवेअर अद्ययावतीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) या कालावधीत होणार असून, यामुळे पोर्टल वरील सर्व सेवा आणि प्रणाली काही काळासाठी बंद राहणार आहेत.
या पाच दिवसांच्या कालावधीत बहुतांश दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असल्याने, नागरिकांना त्रास टाळण्यासाठी आपली शासकीय कामे आधीच पूर्ण करावीत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी केले आहे. आपले सरकार सेवा केंद्र, सेतूकेंद्र चालवणारे कर्मचारी, ग्रामपंचायती आणि शासकीय विभागातील कर्मचाऱ्यांनीही आपल्या कामांचे नियोजन त्वरित करावे, अशी सूचना देण्यात आली आहे.
‘आपले सरकार’ पोर्टल हे नागरिकांसाठी शासकीय सेवांचा महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या खंडिततेमुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी आता पासूनच तयारी करणे गरजेचे आहे. अधिक माहितीसाठी स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही प्रशासना नेस्पष्ट केले आहे.