मनमानीचा झटका: विधुत विभागाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

“वीजेअभावी शेतकरी हैराण: कुरखेड्यात पिकांचा ऱ्हास”
कुरखेडा,१० एप्रिल : कुरखेडा तालुक्यातील शेतकरी सध्या विधुत विभागाच्या मनमानी कारभारामुळे अक्षरशः हवालदिल झालेआहेत. दुहेरी हंगामात मिरची, मका आणि धानासारखी पिके घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्यांना पुरेसा विधुत पुरवठा मिळतनसल्याने त्यांचे स्वप्न पाण्यात मुरत आहे. जाहीर लोडशेडिंगच्या वेळापत्रकातही वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून, रात्रीआणि दिवसा अर्धा ते एक तास विजेची कपात होत आहे. यामुळे पाण्याच्या पंपांना गती मिळत नाही आणि कमी होल्टेजच्या समस्येने शेतकऱ्यांचे हातपाय गळून पडले आहेत.
तालुक्यात काही गावांमध्ये ७ तास, तर काही ठिकाणी ५ तास लोडशेडिंग असूनही, जाहीर वेळेतही वीज पुरवठा स्थिर राहत नाही. “दिलेल्या वेळेतही बिच्चम बिच्च मध्ये वीज जाते, मग आम्ही पिकांना पाणी कसे द्यायचे?” असा संतप्त सवाल शेतकरी मांडत आहेत. विधुत विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, “फॉल्ट आहे” किंवा “तांत्रिक अडचण आहे” अशी उत्तरे देऊन हात झटकले जात आहेत. मात्र, या समस्येचे मूळ कारण आणि त्यावर ठोस उपाय कधी होणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही.
या संकटाचा सर्वाधिक फटका छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना बसत आहे. “आम्ही कर्ज काढून पिके लावली, पण वीजच मिळतनाही तर कर्ज कसे फेडायचे? धान पाण्यासाठी मरत आहे, पण अधिकारी ऐकतच नाहीत,” अशी खंत येथील शेतकरी विजय भैसारे यांनी व्यक्त केली. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून या समस्येकडे लक्ष देण्याचे आश्वासन मिळत असले, तरी प्रत्यक्ष कृती दिसत नाही. “सभेत बोलतात, पण शेतात उतरत नाहीत,” अशी टीका शेतकरी करत आहेत.
दरम्यान, तालुक्यातील नागरिकांनी आता या प्रश्नावर ठोस उपाययोजनांची मागणी लावून धरली आहे. “शेतकऱ्यांचे नुकसान कोणभरून देणार? अधिकाऱ्यांची ही मनमानी किती दिवस चालणार?” असा सवाल उपस्थित होत आहे. काही गावांमध्ये शेतकऱ्यांनी विधुत कार्यालयावर मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली असून, जोपर्यंत ही समस्या सुटत नाही, तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. विधुत विभागाच्या या नाकर्तेपणामुळे तालुक्यातील शेती संकटात सापडली असून, तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्तहोत आहे.