फुटपाथ व्यावसायिकांच्या रोजगारासाठी पर्यायी जागा द्या, अन्यथा आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन : शेतकरी कामगार पक्षाचा इशारा

गडचिरोली, ११ एप्रिल : रस्त्याच्या कडेला फुटपाथवर लहान व्यवसाय करणाऱ्या हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. नगर परिषदेने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून या व्यावसायिकांच्या टपऱ्या हटविल्याने संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी कामगार पक्षाने या व्यावसायिकांना तातडीने पर्यायी जागा आणि रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली असून, मागणी पूर्ण न झाल्यास आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या घरासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, स्थानिक भूमिपुत्र असलेल्या फुटपाथ व्यावसायिकांना लक्ष्य करून त्यांचे व्यवसाय बंद पाडण्यात आले, तर मोठ्या भांडवलदारांच्या अतिक्रमणांकडे मात्र दुर्लक्षकेले जात आहे. “गुजराती–मारवाडी व्यापाऱ्यांच्या मोठ्या दुकानांना फायदा मिळावा म्हणून गरीब व्यावसायिकांचे रोजगार हिरावले जात आहेत. ही बाब अन्यायकारक आहे,” अशी तीव्र टीका जराते यांनी केली. त्यांनी नगर परिषदेने गांधी चौकातील सौंदर्यीकरण आणि बेकायदेशीर जाहिरात फलकांना परवानगी देऊन दुजाभाव केल्याचा आरोपही केला.
“अतिक्रमण हटाव मोहीम वाहतुकीसाठी आवश्यक असली तरी फक्त लहान व्यावसायिकांना लक्ष्य करणे चुकीचे आहे. प्रस्तावित सर्व्हिस रोड वरील मोठ्या अतिक्रमणांवर कारवाई का होत नाही?” असा सवाल ही पक्षाने उपस्थित केला आहे. पक्षाने नमूद केले की, अतिक्रमण हटाव मोहिमेतून प्रभावित झालेले ७० टक्के फुटपाथ व्यावसायिक हे स्थानिक आणि भाजपचे मतदार आहेत, तरी हीत्यांच्यावर अन्याय होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे आणि जयश्रीताई वेळदा यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला आहे. “फुटपाथ व्यावसायिकांना तातडीने पर्यायी जागा आणि रोजगार मिळाला नाही, तर आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या घरा समोर बेमुदत ठिय्या आंदोलन केले जाईल,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणाने गडचिरोलीत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.