वॉइस ऑफ मीडिया सिरोंचा तालुका कार्यकारिणी गठीत : सतीश राचर्लावार अध्यक्ष, जाकिर अली सरचिटणीसपदी

सिरोंचा, दि. १२ एप्रिल २०२५ : पत्रकारितेच्या क्षेत्रात सशक्त पाऊल टाकत वॉइस ऑफ मीडियाने सिरोंचा तालुक्यात आपली नवीनकार्यकारिणी स्थापन केली आहे. येथील शासकीय विश्रामगृहात आज आयोजित पत्रकारांच्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. या बैठकीत संघटनेचे ध्येय, धोरणे आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर चर्चा झाली, ज्यामुळे सिरोंचा तालुक्यातील पत्रकारांनाएका व्यासपीठावर एकत्र येण्याची संधी मिळाली.
सर्वसंमतीने सतीश राचर्लावार यांची तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर जाकिर अली यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या शिवाय, तिरुपती चिट्ट्यला यांची उपाध्यक्ष, नागभूषणम चकिनारपूवार यांची कार्याध्यक्ष, रवी कल्पोटा यांची सहसचिव आणि छोटू खान यांची संघटकपदी नियुक्ती झाली. कौसर खान, सतीश भोगे, सुरेश टिपट्टीवार आणि संदीप राचरलावार यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली. विशेष बाब म्हणजे, संदीप राचरलावार यांची गडचिरोली जिल्हा कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी ही नियुक्ती करण्यात आली आहे.
वॉइस ऑफ मीडियाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश खाटीकआणि विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांमध्ये कार्यकारिणी गठनाचे काम जोमाने सुरू आहे. “पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि सत्यनिष्ठ पत्रकारितेला बळ देण्यासाठी वॉइस ऑफ मीडिया कटिबद्ध आहे,” असे जिल्हाकार्याध्यक्ष नसिर हाशमी यांनी यावेळी सांगितले.
सदर निवड प्रक्रिया गडचिरोली जिल्हाध्यक्ष व्यंकटेश दुडूमवार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे व जिल्हाकार्याध्यक्ष नसिर हाशमी यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडली.
या बैठकीत उपस्थित पत्रकारांनी स्थानिक समस्यांवर चर्चा करताना, पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक जागरूकता वाढवण्यावर भर दिला. सिरोंचा तालुका हा आदिवासी आणि ग्रामीण भाग असल्याने येथील समस्यांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. “ही कार्यकारिणी स्थानिक पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या आवाजाला अधिक ताकद देईल,” अशी आशा जाकिर अली यांनी व्यक्त केली.
हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील पत्रकारितेला नवसंजीवनी देणारा ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. नवनिर्वाचित कार्यकारिणीने तातडीने आपल्या जबाबदाऱ्या स्वीकारत स्थानिक पातळीवर कार्याला सुरुवात करण्याचा निर्धार केला आहे. भविष्यात अशा बैठका आणि उपक्रमांद्वारे पत्रकारांचे प्रश्न आणि समाजहिताचे मुद्दे अधिक प्रभावीपणे मांडले जाणार आहेत.