मेंढा (लेखा) ग्रामसभेचा आदर्श : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला स्वराज्याचा अनुभव

गडचिरोली, १२ एप्रिल: धानोरा तालुक्यातील मेंढा (लेखा) या आदर्श ग्रामसभेला जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी काल भेट देत स्थानिक स्वराज्य व्यवस्थेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. ग्रामसभा सदस्यांशी थेट संवाद साधत त्यांनी पारदर्शक निर्णय प्रक्रिया आणि गावाच्या प्रगतीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी एकल सेंटरमार्फत स्थानिक युवकांना ‘बेअरफुट टेक्नीशियन’ प्रशिक्षण देण्याच्या आणि मनरेगा योजनेंतर्गत कामे करण्याच्या सूचना दिल्या.
ग्रामसभा अध्यक्ष देवाजी तोफा यांनी सांगितले की, २७ एप्रिल २०११ रोजी बांबू विक्रीसाठी ट्रांझिट पास मिळवणारी मेंढा (लेखा) ही देशातील पहिली ग्रामसभा ठरली. आज १८०० हेक्टर सामुदायिक वनहक्क मिळाले असून, त्यापैकी ३०० हेक्टरवर मनरेगा कामे सुरू आहेत, तर १५०० हेक्टर जंगलाचे संवर्धन केले जाते. बांबू लागवड, वन तलाव खोलीकरण, मिश्र रोपवाटिका यांसारख्या उपक्रमांनी स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
“दिल्ली–मुंबई आमचं सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत ग्रामसभेने स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. गावात बिनविरोध निवडणुका, महिलांचा लक्षणीय सहभाग, कोणत्याही नागरिकावर पोलिस केस नसणे आणि लोकशाही मूल्यांवर आधारित निर्णय प्रक्रिया ही या ग्रामसभेची वैशिष्ट्ये आहेत. गौण वनोपजाच्या थेट खरेदी मुळेही गावाची आर्थिक प्रगती होत आहे.
यावेळी महिला महाविद्यालय गडचिरोलीचे प्रा. कुंदन दुपारे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. भूपेंद्र गौर, जिल्हा परिवर्तन समितीचे टेक्निकल ऑफिसर गणेश ठावरे, नोडल अधिकारी सतीश वड, ग्रामपंचायत सरपंच नंदताई दुगा, एकल सेंटरचे समन्वयक निलेश देसाई, चंद्रकांत किचक, तालुका महाग्रामसभा अध्यक्ष बाजीराव नरोटे, मांळदाचे ग्रामसभा अध्यक्ष कृष्ण भुरखुरिया, रोहयोच्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी किरण गज्जलवार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.