गडचिरोलीत मलेरियाविरुद्ध लढाईला गती; कार्यगटाच्या पहिल्या बैठकीत कृती आराखड्याला मूर्त स्वरूप

गडचिरोली, १३ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्याला मलेरियामुक्त करण्याच्या संकल्पाला बळ देणारी एक निर्णायक पायरी काल उचलली गेली. राज्य शासनाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या १४ सदस्यीय मलेरिया नियंत्रण कार्यगटाची पहिली बैठक सर्च फाउंडेशन, शोधग्राम येथे कार्यगटाचे अध्यक्ष व सर्च फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अभय बंग यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली.
या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, उपमुख्यमंत्री यांचे सल्लागार डॉ. आनंद बंग, हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरीकिलनाके, गेट्स फाउंडेशनचे डॉ. अमोल पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, सर्च फाउंडेशनच्या डॉ. सुप्रियालक्ष्मी तोटीगर आणि भामरागडचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनीष धकाते यांच्यासह कार्यगटाचे सदस्य उपस्थित होते.
विशेष म्हणजे, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नामवंत तज्ज्ञांनी बैठकीला हजेरी लावली. यामध्ये FDEC हिवताप सल्लागार डॉ. अल्ताफ लाल, ओडिशाचे माजी आरोग्य संचालक डॉ. मदन प्रधान, नाशिकच्या राज्य व कुटुंबकल्याण प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दावल साळवे, NIMR चे डॉ. हिम्मत सिंह आणि NVBDC दिल्लीचे माजी संचालक डॉ. निरज धिंग्रा यांनी आपले मौलिक मार्गदर्शन केले.
बैठकीत येत्या तीन वर्षांसाठी तयार करण्यात आलेल्या मलेरिया निर्मूलन कृती आराखड्यावर सखोल चर्चा झाली. प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक पातळीवरील सहकार्य, तंत्रज्ञानाचा वापर आणि संसाधनांचे योग्य नियोजन यावर विशेष भर देण्यात आला. मलेरियाच्या प्रत्येक रुग्णा पर्यंत पोहोचून उपचार आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
ही बैठक गडचिरोली जिल्ह्यात मलेरिया नियंत्रणाच्या दिशेने एक ऐतिहासिक टप्पा ठरली आहे. स्थानिक आरोग्य यंत्रणा, तज्ज्ञ आणि समुदाय यांच्या एकजुटीतून मलेरियामुक्त जिल्ह्याचे स्वप्न लवकरच साकार होईल, असा ठाम विश्वास या बैठकीतून निर्माण झाला. येत्या काळात ठोस कृती आणि कटिबद्ध प्रयत्नांद्वारे मलेरिया विरुद्धच्या या लढाईला गती मिळणार आहे.