भंडाऱ्यात रेती घोटाळ्या पाठोपाठ गडचिरोलीत गैरव्यवहार: दर्शन निकाळजेंवर बडतर्फीची मागणी

गडचिरोली, १७ एप्रिल : भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात रेतीच्या अवैध उत्खनन आणि साठेबाजी प्रकरणात उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे आणि तहसीलदार मोहन टिकले यांचा सहभाग उघड झाल्याने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी त्यांना निलंबित केले आहे. नागपूरच्या विभागीय महसूल आयुक्तांच्या चौकशीत भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे सापडले, ज्याच्या आधारावर ही कारवाई झाली. दरम्यान, निकाळजे यांचे गडचिरोलीतील कथित गैरप्रकार समोर आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार दाखल झाली आहे, ज्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तुमसर मधील रेती घोटाळ्याने स्थानिक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. चौकशीत निकाळजे आणि टिकले यांनी नियमांचे उल्लंघन करून अवैध उत्खननाला प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा संशय आहे. या प्रकरणाने भंडारा जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
निकाळजे यांच्या वरील कारवाईचा धुरळा ताजा असतानाच गडचिरोलीतील त्यांचे कारनामे उघड झाले. कुरखेडा येथे उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी राइस मिलर्सच्या संगनमतीने शासकीय नियम धाब्यावर बसवले. सीएमआर धान भरडाई, तांदूळ प्रकरण, खरेदी केंद्र ते राइस मिल आणि राइस मिल ते शासकीय गोदामा पर्यंत वाहतुकीत कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीने प्रशासकीय वर्तुळात खळबळ माजली असून, उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली आहे.
काँग्रेसचे युवा नेते पिंकू बावणे यांनी निकाळजे यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी निकाळजे यांना तात्काळ बडतर्फ करावे, शासनाच्या नुकसानीची वसुली करावी आणि त्यांच्या संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करावी, अशी मागणी उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. बावणे यांच्या मते, निकाळजे यांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून सामान्य जनतेचा विश्वासघात केला आहे.
या घडामोडींमुळे भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांतील प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रेती घोटाळ्या पासून ते धान–तांदूळ वाहतुकीतील गैरप्रकारांपर्यंत, निकाळजे यांच्यावरील आरोपांनी प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर आघात केला आहे. सूत्रांनुसार, या प्रकरणात आणखी काही अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, ज्याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करू शकतो.
निकाळजे आणि टिकले यांच्या निलंबना नंतर गडचिरोलीतील तक्रारींच्या आधारावर पुढील कारवाई काय होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्याची शक्यता आहे. या प्रकरणाने शासकीय यंत्रणेतील भ्रष्टाचारा विरोधात कठोर पावले उचलण्याची गरज अधोरेखित झाली आहे.