कोरचीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य समाज प्रबोधन मेळावा: सामाजिक समतेचा जागर

कोरची, 18 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती निमित्त कोरची येथील बुद्ध भूमीवर 14 एप्रिल 2025 रोजी भव्य समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याने बाबासाहेबांच्या सामाजिक समता आणि न्यायाच्या विचारांचा जागर करत समाजाला एकजुटीचे आवाहन केले. गोंदियाच्या सामाजिक विचारवंत एडवोकेट सविता बेदरकर यांनी बाबासाहेबांच्या अतुलनीय योगदानाचा गौरव करत समाज प्रबोधनाचा संदेश दिला.
एडवोकेट सविता बेदरकर यांनी मार्गदर्शन करताना बाबासाहेबांनी महिलांना संपत्ती आणि उपसंपत्तीचा अधिकार मिळवून देण्याचे क्रांतिकारी कार्य केल्याचे सांगितले. “बाबासाहेबांनी महिलांना सातबारावर स्थान मिळवून दिले. त्यांचे उपकार इतके प्रचंड आहेत की, आम्ही कातड्याचे जोडे बनवून त्यांच्या पुतळ्याच्या पायात घातले तरी त्यांचे पांग फेडू शकणार नाही,” असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. त्यांनी बाबासाहेबांनी दलित, वंचित आणि महिलांच्या उत्थानासाठी केलेल्या कार्याला वंदन करत समाजाला त्यांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले.
मेळाव्याचे अध्यक्ष दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विजय बनसोड यांनी भूषवले. उद्घाटन नगरपंचायत नगराध्यक्ष हर्षलता भैसारे यांनी केले, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नागरिक रामदास साखरे उपस्थित होते. प्रमुख अतिथींमध्ये गटशिक्षणाधिकारी अमित दास, नगरसेवक डॉ. शैलेंद्र बिसेन, भाजप नेते आनंद चौबे, तालुका बौद्ध समाज अध्यक्ष अशोक कराडे, सचिव महेश लाडे, प्राचार्य नंदू गोबाडे, पत्रकार नंदकिशोर वैरागडे आणि इतर मान्यवर सहभागी झाले. या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित भीम गीत स्पर्धेत ममता सुखदेव यांनी प्रथम, नंदिनी कराडे आणि लता साखरे यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस देण्यात आले. चिमुकल्या मुलींनी भीम गीतांवर सादर केलेल्या नृत्याने उपस्थितांचे मन जिंकले. या सादरीकरणाचे कौतुक करत पाहुण्यांनी मुलींना बक्षीस देऊन गौरवले.
नगराध्यक्ष हर्षलता भैसारे, डॉ. शैलेंद्र बिसेन आणि आनंद चौबे यांनी बाबासाहेबांचे विचार आजच्या काळातही प्रासंगिक असल्याचे सांगितले. अध्यक्ष विजय बनसोड यांनी ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या त्रिसूत्रीचा उल्लेख करत युवकांना समाज कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले. मेळाव्याचे संचालन किशोर साखरे यांनी केले, तर देवराव गजभिये यांनी प्रास्ताविक आणि चंद्रशेखर अंबादे यांनी आभार प्रदर्शन केले.
सायंकाळी कोरचीसह बाहेरील गावांहून आलेल्या बौद्ध बांधवांसाठी अल्पोहाराची व्यवस्था होती. रात्री राष्ट्रीय प्रबोधनकार आयुष्यमान भिमेश भारती यांच्या क्रांतिकारी भीम गीतांनी जल्लोषमय वातावरण निर्माण केले. कोरची बौद्ध समाज, रमाई महिला मंडळ, तालुका बौद्ध समाज, समता सैनिक दल आणि युवक मंडळींच्या सहकार्याने हा मेळावा यशस्वी झाला. कोरची पोलिसांच्या बंदोबस्तामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.