भाडेकरूच निघाला खूनी! निवृत्त महिला अधिकाऱ्याच्या हत्येचा पाच दिवसांत उलगडला गूढ

गडचिरोली, १८ एप्रिल : शहरातील नवेगाव येथील सुयोगनगर परिसरात निवृत्त महिला अधिकारी कल्पना केशव उंदीरवाडे यांच्या भरदिवसा झालेल्या निर्घृण हत्येने खळबळ उडाली होती. पाच दिवसांच्या अथक तपासानंतर पोलिसांनी या खुनाचा गूढ उलगडला असून, धक्कादायक खुलासा झाला आहे की, हा खून दुसऱ्या कोणी नव्हे, तर त्यांच्याच घरात भाडेकरू म्हणून राहणाऱ्या विशाल ईश्वर वाळके (वय 40, मूळचा एटापल्ली) याने केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
13 एप्रिल रोजी दुपारी 12 ते 2:30 वाजता दरम्यान कल्पना उंदीरवाडे यांचा त्यांच्या कल्पना विहार येथील निवासस्थानी डोक्यावर जड वस्तूने वार करून खून करण्यात आला. आरोपीने कोणतेही ठोस पुरावे मागे ठेवले नव्हते, तरीही गडचिरोली पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारावर विशालला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कर्ज आणि उसनवारीच्या ओझ्याखाली चोरीच्या उद्देशाने हा गुन्हा केल्याचे कबूल केले. चोरी दरम्यान कल्पना यांनी विरोध केल्यानंतर त्याने त्यांचा खून करून दागिने लंपास केले.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अचूक तपास करत हा गुन्हा उघडकीस आणला. या कारवाईने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे. सध्या पुढील तपास सुरज जगताप यांच्या नेतृत्वात सुरू आहे.