धमदीटोल्यात आदिवासी कंवर समाजाचा भव्य सामूहिक विवाह सोहळा; 22 जोडप्यांचा शुभविवाह

कूरखेडा, 20 एप्रिल : धमदीटोला, नान्ही येथे आदिवासी कंवर समाज क्षेत्रीय समितीच्या वतीने आयोजित 21 व्या सामूहिक विवाह सोहळ्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगडमधील 22 जोडप्यांनी आज, रविवारी दुपारी 3 वाजता नव्या आयुष्याला सुरुवात केली. गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून हा सोहळा समाजात एकता आणि समभाव वाढवण्याचा पथदर्शी उपक्रम ठरला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी कंवर समाज जिल्हा अध्यक्ष बिंदुलाल फूलकुंवर होते. आमदार रामदास मसराम, आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दूधनांग, कंवर समाज संघटनेचे मार्गदर्शक डॉ. मेघराज कपूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी खासदार किरसान यांनी सामूहिक विवाहाच्या माध्यमातून आदिवासी समाजात संघटितपणा आणि समता निर्माण होण्याचे महत्त्व विशद केले. आमदार मसराम यांनी समाजाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि गावागावात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा संकल्प व्यक्त केला.
सूनेरजी सोनटापर यांच्या प्रस्ताविकाने सुरू झालेल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन नीलकंठ बखर यांनी केले, तर गणेश सोनकंलगी यांनी आभारप्रदर्शन केले. क्षेत्रीय अध्यक्ष, पदाधिकारी आणि समाज बांधवांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वी ठरला. कंवर समाजाच्या या प्रेरणादायी उपक्रमाने सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक एकतेचा आदर्श निर्माण केला आहे.