गडचिरोलीत पालकमंत्र्यांचा ‘कंपनीप्रेम’, शेतकऱ्यांचे प्रश्न ‘जैसे थे’; काँग्रेसचे २२ एप्रिलला चक्काजाम

गडचिरोली, २० एप्रिल : गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सहपालकमंत्री आशीष जयस्वाल यांच्याकडे जबाबदारी असली, तरी सर्वसामान्यांचे प्रश्न सुटत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. शेतकरी, आदिवासी आणि सामान्य नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे आणि आमदार रामदार मसराम यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. याच पार्श्वभूमीवर, २२ एप्रिल रोजी देऊळगाव येथे चक्काजाम आंदोलनाची घोषणा काँग्रेसने केली आहे.
जिल्ह्यात खंडित वीज पुरवठ्यामुळे मका आणि धान पिकांचे मोठे नुकसान होत आहे. कृषिपंपांना पुरेशी वीज मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. “वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होईल,” असे आमदार मसरामयांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी ब्राह्मणवाडे, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. कविता मोहरकर, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, प्रदेश सचिव पंकज गुड्डेड्डेवार आणि शहराध्यक्ष सतीश विधाते उपस्थित होते.
काँग्रेस नेत्यांनी पालकमंत्र्यांवर तीव्र टीका केली. “मुख्यमंत्री फडणवीस केवळ लोहखनिज प्रकल्पांच्या कार्यक्रमांसाठी गडचिरोलीत येतात. गरीब आदिवासी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही,” असे ब्राह्मणवाडे यांनी ठणकावले. मसराम यांनी सभागृहात वनपट्टे, रानटी हत्तींचा उपद्रव आणि वीज पुरवठ्यासह अनेक प्रश्न उपस्थित केले, पण सत्ताधाऱ्यांकडून ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप केला.
काँग्रेसच्या मागण्यांमध्ये २४ तास वीजपुरवठा, रानटी हत्तींवर नियंत्रण, वनपट्टे नियमित करणे, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, धानखरेदी घोटाळ्याची चौकशी, सुपीक जमिनीचे अधिग्रहण थांबवणे, मनरेगाची प्रलंबित मजुरी देणे, महामार्ग–राज्य मार्गांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आणि रिक्त पदे भरणे यांचा समावेश आहे. “या मागण्यांसाठी २२ एप्रिलला देऊळगावात चक्काजाम करू,” असे ब्राह्मणवाडे म्हणाले.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात शेती, वनपट्टे आणि पायाभूत सुविधा यासारख्या मूलभूत प्रश्नांचे निराकरण होणे गरजेचे आहे. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय नसल्याने जनतेच्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. “आंदोलनाला शेतकरी आणि आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी होतील,” असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला.
या आंदोलनाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकार यावर काय पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसने जनतेच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. गडचिरोलीच्या विकासासाठी हा लढा पुढेकसा आकार घेतो, याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.