म्हैसूर येथे ‘आदिवासी संस्कृती आणि परंपरा’ कार्यशाळा: श्री. रवींद्र ठाकरे, डॉ. श्यामराव कोरेटी संबोधित करणार

नागपूर , २० एप्रिल: भारत सरकारने २०२५ हे जनजाती गौरव वर्ष म्हणून घोषित केले असून, या निमित्ताने देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. याच अनुषंगाने म्हैसूर येथील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्थेत २५ एप्रिल २०२५ रोजी“आदिवासी संस्कृती आणि परंपरा” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि त्यांच्या समस्यांवर चर्चा होणार आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री. रवींद्र एच. ठाकरे, भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी, यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आदिवासी समाजाच्या परंपरा आणि प्रशासकीय सेवेतील स्वच्छ प्रतिमेसाठी प्रसिद्ध असलेले ठाकरे नागपूर येथे अतिरिक्तआदिवासी आयुक्त असताना अनेक कल्याणकारी योजना राबविल्या. सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या माहिती आयोगात माहितीअधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच, विषय तज्ञ म्हणून डॉ. श्यामराव कोरेटी, अधिष्ठाता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, उपस्थित राहणार आहेत. आदिवाही भाषा, संस्कृती संरक्षणासाठी त्यांचे संशोधन आणि ‘मध्य प्रदेशातील गोंड लोकांचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास’ यासारखे प्रबंध उल्लेखनीय आहेत. याशिवाय, राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्था, म्हैसूर येथील डॉ. के. आर. प्रकाश हे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होणार असून, त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे दक्षिण भारतातील आदिवासी भागात वीज, पाणी पुरवठ्या सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेच्या संचालक डॉ. श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग यांच्या हस्ते होईल. ऑनलाइन आणि ऑफलाइन स्वरूपात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक असून, सर्व सहभागींना प्रमाणपत्र दिले जाईल. जास्तीत जास्त सहभागासाठी मुख्य वैज्ञानिक डॉ. प्रकाश एम. हलामी यांनी आवाहन केले आहे. ही कार्यशाळा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक वारशाला उजागर करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरणार आहे.