April 25, 2025

कुरखेडा तालुक्यात बीएसएनएल नेटवर्क समस्येमुळे नागरिक त्रस्त; चांगदेव फाये यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने बीएसएनएल अधिकाऱ्यांशी केली चर्चा

कुरखेडा, 21 एप्रिल : कुरखेडा तालुका आणि गेवर्धा परिसरात भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) च्या नेटवर्क समस्येमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. मागील अनेक दिवसांपासून नेटवर्क धरसोड होत असल्याने मोबाइल कॉल्स, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे शासकीय, खाजगी आणि शैक्षणिक कामांना खीळ बसली आहे. या समस्येच्या निराकरणासाठी भारतीय जनता पार्टीचे (भाजप) तालुका अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने बीएसएनएल अधिकाऱ्यांशी चर्चा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

कुरखेडा तालुक्यातील अनेक गावे आणि शहरी भागात बीएसएनएलच्या सेवेची गुणवत्ता घसरली आहे. ऑनलाइन कामांसाठी शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना नेटवर्कच्या अभावामुळे कामे लांबणीवर पडत आहेत. यामुळे अनेक ग्राहक बीएसएनएल सिम इतर खाजगी टेलिकॉम कंपन्यांमध्ये पोर्ट करण्याचा विचार करत आहेत. शिष्टमंडळाने तालुक्यातील सर्व बीएसएनएल टॉवर्स तातडीने कार्यान्वित करण्याची आणि नव्याने उभारलेले टॉवर्स सुरू करण्याची मागणी केली.

चर्चेदरम्यान रोशन सय्यद, राजू बारई, नितीन कुथे, राजेंद्र कुमरे, सुधीर बाळबुद्धे, विनोद दोनाडकर, योगेश नखाते, दत्तू कराणकर, भुनेश्वर कांबळे, तेजराम बाळबुद्धे, मोरेश्वर बुद्धे आणि अनेक नागरिक उपस्थित होते. “बीएसएनएलने सेवा सुधारल्यास ग्राहकांचा विश्वास टिकेल; अन्यथा इतर पर्याय शोधावे लागतील,” असे चांगदेव फाये यांनी सांगितले. नवीन टॉवर्स बंद ठेवण्याच्या कारभारावरही शिष्टमंडळाने नाराजी व्यक्त केली. नागरिकांनी बीएसएनएल प्रशासनाला नेटवर्क समस्या त्वरित सोडवण्याचे आणि चांगली सेवा देण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!