शिक्षण आणि सुरक्षेला बळ: जिल्हाधिकारी पंडा यांचा शाळा तपासणी दौरा

गडचिरोली, २६ एप्रिल : जिल्हास्तरीय शाळा सुरक्षा समितीच्या अंतर्गत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज गडचिरोलीतील जिल्हा परिषद शाळांना आकस्मिक भेटी देत मूलभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांची कसून तपासणी केली. शाळांमधील शौचालयांची उपलब्धता, जेवणासाठी शेड्सची स्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. या दौऱ्यात त्यांनी काटली, नगरी आणि वसाचक येथील शाळांना भेटी दिल्या, तसेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी पंडा यांनी शाळांमधील कमतरतांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जेवणासाठी शेड्स एका वर्षात उभारण्याचे नियोजन, स्वयंपाक शेड्सचे आधुनिकीकरण, इमारतींच्या गळतीची दुरुस्ती, स्वच्छतागृहांचे नूतनीकरण आणि जुन्या साहित्याचे निर्लेखन त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा परिषदेला दिल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या स्थितीची चौकशी करत, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शौचालयांची सोय तपासली. कमतरता आढळलेल्या ठिकाणी तात्काळ सुधारणा करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
या तपासणी दौऱ्यात अतिरिक्त पोलिस अधीक्षक एम. रमेश, शिक्षणाधिकारी वासुदेव भुसे, बाबासाहेब पवार, सार्वजनिक बांधकामविभागाचे अभियंता विपिन साळुंके, उपअभियंता भांडारकर, समग्र शिक्षा अभियानाचे लांजेवार, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्रसाहाळा यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पंडा यांच्या या दौऱ्यामुळे शाळांमधील सुविधा आणि सुरक्षेच्या बाबतीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शिक्षण वातावरण मिळावे, यासाठी प्रशासनाचे हे पाऊल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.