“गडचिरोलीत दारूतस्करांचा नवा डाव; गाडीच्या गुप्त कप्प्यात लपवलेली दारू पाहून पोलिसांना धक्का!”

गडचिरोली, २८ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानाही अवैध दारूतस्करीच्या नाविन्यपूर्ण पद्धतींनी पोलिसांना आव्हान दिले आहे. नक्षलग्रस्त आणि तेलंगणा, छत्तीसगड तसेच चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या या जिल्ह्यात तस्करांनी दारू वाहतुकीसाठी विविध शक्कल लढविल्या आहेत. कधी दुचाकीच्या पेट्रोल टँकमध्ये दारूच्या बाटल्या, कधी पार्सल सामानात, तर कधी नदीमार्गे बैलगाडीतून तस्करी केली जाते. मात्र, यावेळी तस्करांनी तर कमालच केली! अहेरी तालुक्यात २६ एप्रिल २०२५ रोजी रात्री पोलिसांनी एका चारचाकी वाहनातून लपवलेल्या दारूचा साठा जप्त करत तस्करांचा नवा जुगाड उघडकीस आणला. या कारवाईने पोलिसही चक्रावून गेले.
अहेरी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, महागाव ते अहेरी रस्त्यावर अवैध दारूतस्करी होणार आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जपवार यांनी आपल्या पथकासह रात्री ११:३० वाजता नाकाबंदी सुरू केली. मध्यरात्रीपर्यंत अनेक वाहनांची तपासणी केली, पण काहीच सापडले नाही. अखेर मध्यरात्री १:३० ते २:३० च्या सुमारास एक निळ्या रंगाची चारचाकी पीकअप (क्रमांक MH 34 AB 6070) अहेरीकडे येताना दिसली. भुजंगराव पेठाजवळ वाहन थांबवून तपासणी केली असता फ्लोअर पॅनलवर रिकाम्या गोण्या आढळल्या. मध्यरात्री चंद्रपूर पासिंगची गाडी रिकाम्या गोण्यांसह अहेरीकडे येत असल्याने पोलिसांचा संशय बळावला. कसून तपासणी केल्यावर फ्लोअर पॅनलखाली लपवलेले खास कप्पे आढळले, ज्यात मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू लपवली होती. लोखंडी पत्र्याने बनवलेल्या या कप्प्यांमुळे दारूचा साठा सहजासहजी लक्षात येणे कठीण होते. हा प्रकार पाहून पोलिसांना धक्काच बसला.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ७८ हजार ४०० रुपयांची दारू, २० हजारांचे दोन मोबाइल आणि ३ लाखांचे चारचाकी वाहन असा एकूण ५ लाख ९८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन आरोपी, अनवर खान अबुलहसन खान (वय ४०, बल्लारपूर) आणि चालक सिद्धार्थ भास्कर रंगारी (वय ३५, बल्लारपूर) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) आणि ८३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, यतीश देशमुख, सत्यसाई कार्तिक आणि उपविभागीय पोलीस अधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
गडचिरोलीत दारूबंदी असूनही दक्षिण भागात तस्करी व विक्री थांबत नाही. तेलंगणा, छत्तीसगड आणि चंद्रपूरमधून छुप्या मार्गाने दारू पुरवठा होत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. नक्षल प्रभावामुळे रात्रीच्या वेळी तस्करीला पोषक वातावरण मिळते. पोलिसांनी अनेक कारवाया केल्या, पण तस्कर नवनवीन पद्धती अवलंबतात. या घटनेने तस्करांच्या हुशारीवर प्रकाश पडला असून, पोलिसांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. ही कारवाई अवैध दारूतस्करीविरुद्ध मोठे यश मानली जात आहे, पण या समस्येवर कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे.