आलापल्लीत पोलिसांचा छापा : सात लाखांचा तंबाखू साठा जप्त, आरोपी फरार!

अहेरी, २९ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथील सावरकर चौक परिसरात अहेरी पोलिसांनी आज सकाळी ८.३० वाजता मोठी कारवाई करत सात लाख चव्वेचाळीस हजार नऊशे वीस रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त केला. या प्रकरणात रूणाल झोरे (वय ३३, रा. सावरकर चौक, आलापल्ली) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १२३, २७४, २७६, २७७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी सध्या फरार असून, त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी पथक तैनात केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपीने वनविभागाच्या पडीक घरात महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेल्या सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा लपवून ठेवला होता. जप्त केलेल्या मुद्देमालात सहा लाख त्र्याहत्तर हजार दोनशे रुपये किमतीचे ‘मजा १०८’ ब्रँडचे ७२० डब्बे, सोळा हजार चारशे रुपये किमतीचे ‘होल्ला’ हुक्का तंबाखूचे २० पाउच, बारा हजार चारशे रुपये किमतीचे ‘ईगल’ हुक्का तंबाखूचे ८ पाउच आणि बावन्न हजार नऊशे वीस रुपये किमतीचे ‘सिग्नेचर फीनेस्ट’ पानमसाल्याचे ९८ बॉक्स यांचा समावेश आहे. एकूण मुद्देमालाची किंमत सात लाख चव्वेचाळीस हजार नऊशे वीस रुपये आहे.
ही कारवाई पो.ह.वा. वंदना डोनारकर यांनी केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्निल इज्जपवार आणि सपोनि पटले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मनोज शेंडे यांनी ही माहिती दिली. राज्यात सुगंधित तंबाखूवर कठोर बंदी असताना गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात अशा घटना समोर येणे चिंताजनक आहे. अशा तस्करीमुळे स्थानिक आरोग्य आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होऊ शकतो. पोलिसांनी या प्रकरणात इतर कोणती टोळी कार्यरत आहे का, याचाही तपास सुरू केला आहे. आरोपीला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.