May 2, 2025

आम आदमी पार्टीची सुराज्य मोहीम गडचिरोलीत दाखल: मुरखळा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, न्यायिक लढाईसाठी कायदेशीर मदतीचे आश्वासन

गडचिरोली, १ मे :  आम आदमी पार्टीची (AAP) राज्यव्यापी सुराज्य मोहीम १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून चंद्रपूर येथील आझाद बाग येथून सुरू झाली. ही मोहीम राज्यातील ३६ जिल्ह्यांमधून ४,५०० किलोमीटर प्रवास करत नागरिकांशी संवाद साधेल, स्थानिक ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडेल आणि सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारेल. गडचिरोली येथे या मोहिमेने मुरखळा गावातील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून शेतकऱ्यांना पूर्ण कायदेशीर मदतीचे आश्वासन दिले.

मुरखळा येथील शेतकरी आंदोलन
गडचिरोली शहरात प्रस्तावित विमानतळासाठी मुरखळा, कनेरी, पुलखल, नवेगाव, मुडझा येथील सुपीक शेतजमिनी अधिग्रहित करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शरद ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात मुरखळा येथील सर्व्हे क्रमांक ३२४/२ मध्ये २८ एप्रिलपासून आमरण उपोषण सुरू आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्यादित, नागपूर यांना जमीन देण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. मात्र, शेतकऱ्यांनी आणि संबंधित ग्रामपंचायतींनी याला ठाम विरोध दर्शवला. ग्रामपंचायतींनी विरोधात्मक ठराव मंजूर केले असतानाही प्रशासनाने जनभावना धुडकावल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

AAP च्या सुराज्य मोहिमेच्या शिष्टमंडळाने मुरखळा येथील उपोषण मंडपाला भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली. शेतकरी नेते शरद पाटील यांनी स्पष्ट केले, “आम्ही गडचिरोलीच्या विकासाला विरोध करत नाही, परंतु सुपीक जमिनी घेऊन शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा विकास आम्हाला मान्य नाही. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झुडपी वनजमीन उपलब्ध आहे. वन कायद्यात बदल करून ती विमानतळासाठी वापरावी. खनिज उत्खननासाठी वन कायदा आड येत नाही, मग विमानतळासाठी का येतो? आमच्या जमिनी आम्ही देणार नाही.” त्यांनी पर्यायी जागा म्हणून सुरजागड परिसराचा प्रस्तावही मांडला.

AAP चा पाठिंबा आणि कायदेशीर मदत
AAP चे महाराष्ट्र राज्य संघटक ॲड. मनीष मोडक यांनी शेतकऱ्यांना पाठिंब्याचे लेखी पत्र सुपूर्द केले आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल करून पूर्ण कायदेशीर मदत देण्याची ग्वाही दिली. यावेळी राज्य संघटक भूषण ढाकूलकर, राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे, डॉ. शाहिद अली जाफरी, राज्य सहसचिव सागर पाटील, सोशल मीडिया प्रमुख डॉ. नामदेव भागिले पाटील, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार, गडचिरोली जिल्हा संयोजक नसिर हाशमी, बाळकृष्ण सावसाकडे, प्रेम धोबे, भाऊराव ननावरे, संतोष कोडाप, संतोष कोटकर, केशवजी सातपुते, अविनाश आत्राम, उमेश भांडेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी जुन्या सर्व्हेनुसार शासकीय विज्ञान महाविद्यालयाजवळील जागेवर विमानतळ उभारण्याची मागणी केली, जेणेकरून त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होणार नाही.

आरोग्य सुविधांवर चर्चा
सुराज्य मोहिमेदरम्यान AAP शिष्टमंडळाने गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयाला भेट दिली. रुग्ण आणि नातेवाईकांशी वैद्यकीय सुविधांबाबत चर्चा झाली. १०० खाटांच्या रुग्णालयात १५० हून अधिक रुग्ण असल्याने आरोग्य सुविधा बळकट करण्याची गरज पक्षाने नमूद केली. स्वच्छतेसाठी प्रभावी उपाययोजनांची आवश्यकता आणि वैद्यकीय सेवांमध्ये सुधारणेची गरजही अधोरेखित करण्यात आली.

स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती
गडचिरोलीतील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेत स्थानिक समस्यांवर लक्ष केंद्रित करत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे आणि निवडून आणण्याचे निर्देश देण्यात आले. येथील औपचारिक कार्यक्रम आटोपल्यानंतर मोहीम गोंदियाच्या दिशेने रवाना झाली.

“सुराज्य मोहीम राज्यातील विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी कार्यरत आहे. गडचिरोलीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत AAP ने प्रशासनाला जनभावनांचा आदर करण्याचे आवाहन केले. ही मोहीम पुढे इतर जिल्ह्यांमध्ये स्थानिक समस्यांवर संवाद साधत जनतेच्या हक्कांसाठी लढा देईल.”

About The Author

You may have missed

error: Content is protected !!