March 7, 2026

रानडुक्कर, चितळ शिकार प्रकरण उघड: वनविभागाने तिघांना ठोकल्या बेड्या

“रानडुक्कर आणि चितळ शिकार प्रकरणी वनविभागाची कठोर कारवाई: तिघांना अटक, बलवंतसिंगला तीन दिवसांची वनकोठडी”

कुरखेडा, २९ जुलै : शंकरपूर ते कुरखेडा रस्त्यावर 23.07.2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे वनविभागाने गेवर्धा येथील कोऑपरेटिव्ह बँकेजवळ सापळा रचून अनिकेत दुलाराम बोगा आणि यशवंत देवसाय मडावी यांना 33 किलो रानडुक्कर मांस, मोटरसायकल आणि मोबाइलसह ताब्यात घेतले. हे मांस बलवंतसिंग जालिंदरसिंग रामगडे (रा. जिरोबा वॉर्ड, लाखांदूर, जि. भंडारा) याने लाखांदूर वन परिसरात रानडुक्कराची शिकार करून शंकरपूरपर्यंत पोहोचवले होते, जिथून ते कोरचीकडे नेण्यात येत होते. कुरखेडा वनविभागात रानडुक्कर मांस प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे.

सदर आरोपींना 23.07.2025 रोजी मा. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांच्यासमोर हजर केले असता, त्यांना वनकोठडी सुनावण्यात आली. पुढील तपासात, 27.07.2025 रोजी बलवंतसिंग याच्या लाखांदूर येथील राहत्या घरी वनविभागाने धाड टाकली. तपासात चितळ शिकारीचे मांस विक्रीचे पुरावे, ताज्या चितळाच्या शिंगासह शिकारीचे साहित्य आढळून आले. बलवंतसिंग याला ताब्यात घेऊन प्रथम सत्र न्यायमूर्तींसमोर हजर केले असता, त्याला तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली. चितळ शिकार प्रकरणी लाखांदूर वनविभागात गुन्हा नोंदवून पुढील कारवाई सुरू आहे.

ही कारवाई श्री. वरुण बी.आर., उपवनसंरक्षक, वडसा वनविभाग आणि श्री. रविंद्र सूर्यवंशी, सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बी.एच. डिगोळे, वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव) यांच्या माहितीवर झाली. कारवाईत एल.एम. गोपुलवाड, के.आर. धोंडणे, सचिन पवार, एस. चौव्हान, पी. राऊत, क्षेत्र सहाय्यक, वनरक्षक आणि अन्य कर्मचारी सहभागी होते.

गेल्या सहा महिन्यांत वन्यप्राणी शिकार प्रकरणात दोनदा कारवाई करून शिंग, बारूद, वायर, जाळी, रानटी डुक्कर व आस्वलाचे केस, बिबट्याचे कातडे, नखे इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले. वनविभागाने नागरिकांना अशा अवैध कृत्यांची त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!