डॉ. उईके यांचा गडचिरोली दौरा: आदिवासी विकासाला गती, फडणवीसांचा आभासी सहभाग
गडचिरोली, 30 जुलै : राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके आज गडचिरोलीच्या एकदिवसीय दौऱ्यावर येत असून, आदिवासी विकास योजनांची अंमलबजावणी, स्थानिक विकासकामांचा आढावा आणि लाभ वितरण कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार आहेत. यासोबतच नागपूर विभागातील आदिवासी विकास विभागाचा आढावा घेतला जाणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आभासी पद्धतीने सहभागी होणार असून, विविध योजनांचे उद्घाटन आणि लाभ वितरण होणार आहे.
दौऱ्याचा तपशील:
– सकाळी 9:30: डॉ. उईके शासकीय विश्रामगृह, गडचिरोली येथे पोहोचतील.
– सकाळी 10:30 : सेमाना येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत वृक्षारोपण.
– सकाळी 11:00 : सुमानंद सभागृह, आरमोरी रोड येथे रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन, आश्रमशाळा व वसतिगृह इमारतींचे आभासी लोकार्पण, तसेच पी.एम. जनमन आणि धरती आबा योजनांचा लाभार्थी मेळावा व लाभ वितरण.
– दुपारी 1:30 ते 2:30: राखीव वेळ.
– दुपारी 2:30 ते 4:30 : जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूर विभागीय आढावा बैठक. यात जनजातीय न्याय महाअभियान, धरती आबा ग्राम उत्कर्ष योजना, वनहक्क दावे, अतिक्रमण आणि आदिवासी महामंडळाच्या योजनांचा आढावा.
– सायंकाळी : यवतमाळकडे प्रयाण.
मुख्यमंत्र्यांची आभासी उपस्थिती:
गडचिरोली, अहेरी आणि भामरागड यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत प्रधानमंत्री जनजातीय न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत लाभार्थी मेळावा, नवीन इमारतींचे आभासी लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित राहतील, तर उद्घाटन डॉ. उईके यांच्या हस्ते होईल. यावेळी सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, धर्मरावबाबा आत्राम, डॉ. मिलिंद नरोटे, रामदास मसराम, तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आयुक्त लीना बन्सोड, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, अपर आयुक्त आयुषी सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे आणि मुख्य अभियंता आबासाहेब नागरगोजे उपस्थित राहतील.
लोकार्पण आणि भूमिपूजन:
– भामरागड : कार्यालयीन इमारत, शालेय इमारत आणि मुलींचे वसतिगृह.
– गडचिरोली : सोडे, रेगडी, कारवाफा येथील मुला-मुलींच्या वसतिगृहांचे लोकार्पण.
– अहेरी : बाम्हणी, गुड्डीगुड्डम येथील वसतिगृह.
– भामरागड : कोठी, जांबिया येथील मुलांचे वसतिगृह.
– इतर : घाटी, येरमागड, भाडभिडी, अंगारा येथील वसतिगृहांचे भूमिपूजन.
नागरिकांना आवाहन:
सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव (गडचिरोली), कुशल जैन (अहेरी), नमन गोयल (भामरागड) आणि कार्यकारी अभियंता नितीन मुत्यालवार यांनी नागरिकांना या कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
या दौऱ्यामुळे गडचिरोलीतील आदिवासी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
