March 7, 2026

वादळाचा कहर: वीज खंडित, अधिकारी सुट्टीत – दुरुस्तीचे काम ठप्प

अहेरी, २२ सप्टेंबर : तालुक्यात काल रात्री झालेल्या वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटीने मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला असून, झाडे पडली व इलेक्ट्रिक पोल कोलमडले. कर्मचारी दुरुस्तीच्या कामात गुंतले असले तरी सहाय्यक अभियंता सुट्टीवर गेल्याने पोल उभारणीचे काम रखडले आहे. यामुळे एफडीसीएम, तलवाडा तसेच इतर भागातील नागरिकांना वीज नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

वादळाच्या कहरामुळे तालुक्यातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. अनेक ठिकाणी झाडे व पोल पडल्याने वीज खंडित झाली असून, कर्मचारी सतत फिरत दुरुस्तीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, पोल पडलेल्या ठिकाणी नवीन पोल उभारण्याची गरज असतानाही सहायक अभियंता सुट्टीवर असल्याने निर्णयप्रक्रिया थांबली आहे. “आम्ही पाहणी केली, पोलची गरज आहे. पण अधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय काही करता येत नाही,” असे एका कर्मचाऱ्याने सांगितले. यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास विलंब होत असून, नागरिकांच्या दैनंदिन कामांना मर्यादा येत आहेत.

अहेरी तालुक्यातील हा प्रकार वीज विभागातील जबाबदारीच्या अभावाचे दर्शन घडवतोय. वादळानंतर तात्काळ प्रतिसाद देण्याऐवजी अधिकाऱ्यांचे सुट्टीत असणे हे सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरत आहे. विभागाने याबाबत त्वरित कारवाई करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी होत आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!