September 7, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आम आदमी पार्टीचा आक्रमक पवित्रा: गैरवर्तनाविरुद्ध उपोषणाचा इशारा

कुरखेडा, 23 सप्टेंबर : आम आदमी पार्टी, जिल्हा गडचिरोलीचे उपाध्यक्ष राजू मडावी यांच्या नेतृत्वाखाली कुरखेडा तहसील कार्यालयातील पुरवठा विभागात कार्यरत कनिष्ठ लिपिक महादेव गणपत झाडे यांच्या नागरिकांसोबतच्या गैरवर्तनाविरुद्ध आज तहसीलदार  राहुल पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात रेशन कार्ड प्रक्रियेत नागरिकांना होणारा त्रास आणि अपमानास्पद वागणुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात नमूद केल्यानुसार, झाडे रेशन कार्ड अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या नागरिकांना अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्रास देत आहेत. अर्जात त्रुटी असल्यास अर्जदारांवर अर्ज भिरकावण्याचे आणि उद्धटपणे वागण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (वर्तणूक) नियम, 1979, महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा, 2015 आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 यांचे उल्लंघन होत आहे. मडावी यांनी या गैरप्रकारांची तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राजू मडावी यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, येत्या 8 दिवसांत (1 ऑक्टोबर 2025 पर्यंत) कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण आंदोलन केले जाईल. या आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीला तहसील प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल, असे त्यांनी नमूद केले. या निवेदनामुळे प्रशासनावर दबाव वाढला असून, नागरिकांच्या हक्कांचे रक्षण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या प्रसंगी आम आदमी पार्टीचे जिल्हा कोषाध्यक्ष  इरफान पठाण, सचिव  अमृत मेहेर, जिल्हा कामगार आघाडी प्रमुख साईनाथ कोंडावार, संघटक  ताहिर शेख, सहसंघटक  चेतन गहाणे, सोशल मीडिया प्रमुख अतुल सिंदराम आणि सदस्य अंकुश मडावी उपस्थित होते. मडावी यांनी नागरिकांच्या हक्कांसाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या या पावलाने तालुक्यातील नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!