September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

आरमोरीतील खूनी बिबट्या अखेर जेरबंद! दोन महिलांच्या हत्येनंतर २३ दिवसांची शोधमोहीम यशस्वी

आरमोरी (गडचिरोली), ११ डिसेंबर २०२५ : गेल्या महिन्याभरापासून आरमोरी वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र आरमोरी व इंजेवारी नियतक्षेत्रात सतत वावर करणाऱ्या मानववधारा बिबट्याला अखेर आज सकाळी यशस्वीरीत्या बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.

या बिबट्याने दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी मौजे देऊळगाव येथे आणि दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजी मौजे इंजेवारी येथे दोन महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारले होते. मानवी जीविताला सतत धोका निर्माण झाल्याने स्थानिक नागरिकांनी बिबट्या पकडण्याची जोरदार मागणी केली होती.

मा. प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य वन्यजीव रक्षक, नागपूर यांच्या जेरबंद करण्याच्या आदेशान्वये वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. वरुण बी. आर. व सहाय्यक वनसंरक्षक श्री. आर. एस. सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) श्री. प्रविण आर. बडोले यांच्या नेतृत्वात मोहीम राबविली गेली.

वडसा वनविभागाचे कर्मचारी व गडचिरोली येथील जलद बचाव पथकाने (Rapid Response Team – RRT) संयुक्तपणे २५ ट्रॅप कॅमेरे, ५ लाइव्ह CCTV कॅमेरे तसेच २ अत्याधुनिक ड्रोन कॅमेऱ्यांच्या मदतीने सतत शोधमोहीम राबविली. अखेर आज सकाळी RRT च्या पथकाने बिबट्याला ट्रँक्विलायझरच्या साहाय्याने बेशुद्ध करून यशस्वी जेरबंद केले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे यांनी प्रथमोपचार व तपासणी केल्यानंतर बिबट्याला गोरेवाडा प्राणिसंग्रहालय व वन्यप्राणी बचाव व पुनर्वसन केंद्र, नागपूर येथे सुरक्षित हलविण्यात आले.

या यशस्वी मोहिमेत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. के. आर. धोंडणे, श्री. रवींद्र चौधरी, जीवशास्त्रज्ञ श्री. ललित उरकुडे तसेच RRT चे श्री. भाऊराव वाढई, श्री. अजय कुकडकर, श्री. मकसुद अली सय्यद, श्री. निखील बारसागडे, श्री. कुणाल निमगडे, श्री. गुनवंत बावनवाडे आदींचे मोलाचे योगदान लाभले.

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, या परिसरात बिबट्या व इतर वन्यप्राण्यांचा वावर असल्याने विनाकारण जंगल परिसरात प्रवेश करू नये आणि सतर्क राहावे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!