September 6, 2026

Gadchiroli News Network

“The Voice of Gadchiroli. The Eyes on the World.”

पत्रकारांच्या ३३ मागण्यांसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे बेमुदत उपोषण सुरू

नागपूर, ११ डिसेंबर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि रेडिओ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तात्काळ तोडगा काढावा या मागणीसाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ (VOM इंटरनॅशनल फोरम) या संघटनेने गुरुवारी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले. पंढरपूर येथील राज्य शिखर अधिवेशनात सर्वसंमतीने मंजूर झालेल्या ३३ पानी मागण्यांवर त्वरित कार्यवाही करण्याची मागणी संघटनेने केली आहे.

संस्थापक व आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वात उपोषणकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले. “गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारांवर सतत अन्याय होत आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर साखळी उपोषण केले जाईल,” असा इशारा अनिल म्हस्के यांनी दिला.

प्रमुख मागण्या :
– पत्रकार महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून किमान ₹३०० कोटी निधी उपलब्ध करावा
– गेल्या अनेक वर्षांपासून थकीत शासकीय बिले ३० दिवसांत द्यावीत
– ५ वर्षांपासून दरवाढ न झाल्याने किमान २००% जाहिरात दरवाढ लागू करावी
– सर्व मान्यताप्राप्त माध्यमांसाठी पत्रकारांचे किमान मासिक मानधन शासनाने बंधनकारक करावे
– पत्रकार सुरक्षा कायदा प्रभावीपणे अंमलात आणून जिल्हा-तालुका स्तरावर ‘पत्रकार संरक्षण अधिकारी’ नेमावेत
– पत्रकार व कुटुंबीयांसाठी ₹१० लाख आरोग्य विमा व ₹२५ लाख अपघात विमा योजना लागू करावी
– स्वतंत्र पत्रकार निवृत्तीवेतन योजना व गृहनिर्माण योजनेत २% आरक्षण
– डिजिटल न्यूज पोर्टल, यूट्यूब न्यूज चॅनेलना अधिकृत माध्यमाचा दर्जा व जाहिरातीत स्वतंत्र प्राधान्य
– रेडिओ कर्मचाऱ्यांना अधिस्वीकृती, पत्रकार सुविधा व स्वतंत्र पेन्शन योजना

राज्यभरातील व्हॉईस ऑफ मीडिया पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होत आहेत. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!