July 5, 2026

गडचिरोलीत बनावटगिरीचा कळस! जिल्हा परिषदेच्या नावाने थेट बनावट नियुक्तीपत्र; शिपाई भरतीच्या नावाखाली बेरोजगारांना गंडा

“बनावट भरती जाहिरातीनंतर आता थेट नियुक्ती आदेशच तयार; सीईओ सुहास गाडे यांचा इशारा – “हा आदेश पूर्णपणे खोटा”, पोलिसांत तक्रार दाखल”


गडचिरोली | प्रतिनिधी, ५ जुलै : 

गडचिरोली जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या रॅकेटने आता धोकादायक वळण घेतले असून, जिल्हा परिषदेच्या नावाने थेट शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शाळांमधील परिचर (शिपाई) पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर आता थेट नियुक्ती आदेशच तयार करून उमेदवारांची फसवणूक करण्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासन आणि पोलिस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी संबंधित नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत या प्रकरणी पोलिसांत अधिकृत तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे.

बनावट जाहिरातीनंतर आता बनावट नियुक्ती आदेश

यापूर्वी समाजमाध्यमांवर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदासाठी २२ हजार रुपये मासिक वेतनावर भरती होणार असल्याची बनावट जाहिरात प्रसारित झाली होती. त्यावेळी जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने खुलासा करून कोणतीही भरती प्रक्रिया सुरू नसल्याचे स्पष्ट केले होते.

मात्र, या प्रकरणाची धग ओसरत नाही तोच आता एका उमेदवाराला जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि निवड समितीच्या नावाने कंत्राटी शिपाई पदाचे बनावट नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे उघड झाले आहे.

या बनावट आदेशात मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, कार्यालयीन नमुना, नियुक्तीच्या अटी-शर्ती आणि अधिकृत पत्राचा संपूर्ण फॉरमॅट हुबेहूब वापरण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर उमेदवाराला विशिष्ट तारखेला कामावर रुजू होण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

सीईओंचा इशारा; दोषींवर कठोर कारवाई

मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी या नियुक्तीपत्राची सत्यता फेटाळून लावत तो पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट केले आहे. संबंधितांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही भरतीबाबत अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत कार्यालयातूनच माहिती घेण्याचे आवाहन केले आहे.

गडचिरोलीत बनावट कागदपत्रांचे रॅकेट सक्रिय?

गेल्या काही दिवसांत गडचिरोली जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने खनिज निधीच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश तयार केल्याचा प्रकार राज्यभर गाजला. त्यापूर्वी धान घोटाळ्याशी संबंधित बनावट पत्रावर आमदार नाना पटोले यांच्या बनावट स्वाक्षरीचा प्रकारही समोर आला होता.

आता त्यात बनावट भरती जाहिरात आणि थेट बनावट नियुक्तीपत्र या नव्या प्रकरणाची भर पडल्याने जिल्ह्यात बनावट कागदपत्रांचे जाळे किती खोलवर रुजले आहे, याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

प्रश्नचिन्ह…

  • भरतीच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक करणारे रॅकेट कोण चालवत आहे?
  • अधिकृत कागदपत्रांचे नमुने आणि शिक्के आरोपींपर्यंत कसे पोहोचले?
  • अशा बनावटगिरीमागे संघटित टोळी कार्यरत आहे का?

या सर्व प्रश्नांची उत्तरे आता पोलिस तपासातून समोर येणार आहेत. मात्र, सलग उघडकीस येणाऱ्या घटनांमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बनावट कागदपत्रांचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे मोठे आव्हान तपास यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

About The Author

error: Content is protected !!