July 5, 2026

आर्थिक साक्षरतेची ताकद! प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतून लाभार्थी कुटुंबाला २ लाखांची आर्थिक मदत

Money Wise वित्तीय साक्षरता केंद्राच्या जनजागृतीला यश; सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गडचिरोली, ५ जुलै : आर्थिक साक्षरता आणि सामाजिक सुरक्षा योजनांबाबत योग्य वेळी मिळालेली माहिती एखाद्या कुटुंबासाठी संकटसमयी मोठा आधार ठरू शकते, याचे प्रेरणादायी उदाहरण गडचिरोली तालुक्यात समोर आले आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) अंतर्गत विमा संरक्षण घेतलेल्या लाभार्थ्याच्या आकस्मिक निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची विमा मदत मिळाली असून, आर्थिक साक्षरतेच्या जनजागृतीचे हे यशस्वी फलित मानले जात आहे.

असेस डेव्हलोपमेंट सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या माध्यमातून कार्यरत RBI–Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र गेल्या दोन वर्षांपासून गडचिरोली तालुक्यात आर्थिक साक्षरतेची व्यापक मोहीम राबवत आहे. तालुक्यातील सुमारे ५० टक्के गावांमध्ये पोहोचलेल्या या अभियानातून नागरिकांना घरगुती अर्थसंकल्प, बचतीचे महत्त्व, बँकिंग सेवा, आर्थिक नियोजन, विमा संरक्षण तसेच विविध सामाजिक सुरक्षा योजनांची सविस्तर माहिती दिली जात आहे.

या अभियानांतर्गत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY), अटल पेन्शन योजना (APY) तसेच नवीन बँक खाते उघडण्याबाबत गावागावांत विशेष शिबिरे आयोजित केली जात आहेत. त्यामुळे अनेक नागरिक सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडले जात असून त्यांना प्रत्यक्ष लाभही मिळत आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून १५ सप्टेंबर २०२५ रोजी गडचिरोली तालुक्यातील राखी येथे Money Wise वित्तीय साक्षरता केंद्र व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात आयसीआरपी सौ. योगिता कोठारी, कृषी सखी सौ. पल्लवी बोदलकर आणि श्री. उदय काकपुरे यांच्या सहकार्याने नागरिकांना विविध आर्थिक व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देण्यात आली. त्याच वेळी श्री. पुरुषोत्तम दयाराम बोदलकर यांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग नोंदवून विमा संरक्षण स्वीकारले.

मात्र, ९ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. बोदलकर यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर Money Wise वित्तीय साक्षरता केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा दावा सादर करण्यात आला. दावा मंजूर झाल्यानंतर त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा पुरुषोत्तम बोदलकरयांना २ लाख रुपयांच्या विमा दाव्याचा धनादेश प्रदान करण्यात आला.

बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक अंशुल कुमार आर्या आणि जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक (Lead District Manager) प्रशांत धोंगळे यांच्या हस्ते लाभार्थी कुटुंबाला धनादेश सुपूर्द करण्यात आला. या संपूर्ण विमा नोंदणी व दावा प्रक्रियेत Money Wise वित्तीय साक्षरता केंद्राचे प्रतिनिधी श्री. अंकित चौहान यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

दरम्यान, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. अत्यल्प वार्षिक प्रीमियममध्ये उपलब्ध असलेल्या या योजना आकस्मिक संकटाच्या वेळी कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार देतात. त्यामुळे प्रत्येक पात्र नागरिकाने संबंधित बँक, वित्तीय साक्षरता केंद्र किंवा ग्रामस्तरावरील शासकीय यंत्रणेशी संपर्क साधून या योजनांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

About The Author

error: Content is protected !!