July 5, 2026

कुरखेडा-कोरची पशुसंवर्धन विभागाला नवी दिशा!

“१०० टक्के उद्दिष्टपूर्तीचे जिल्हा उपायुक्तांचे निर्देश”

योजनांचा सखोल आढावा; AEBAS नोंदणी पूर्ण, पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप

कुरखेडा | प्रतिनिधी, ५ जुलै : 

कुरखेडा व कोरची तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या सर्व संस्था प्रमुखांची संयुक्त आढावा सभा रविवारी पंचायत समिती सभागृह, कुरखेडा येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), गडचिरोली डॉ. सुधीर मठवाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विभागाच्या विविध योजनांचा सखोल आढावा घेत शंभर टक्के उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन आणि काटेकोर अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.

सभेच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रदीप गावंडे तसेच तालुका पशुसंवर्धन अधिकारी, कुरखेडा व कोरची यांच्या हस्ते डॉ. मठवाले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर दोन्ही तालुक्यांतील विविध शासकीय योजना, विभागीय कार्यक्रम, प्रलंबित कामे, प्रशासकीय बाबी आणि विभागाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी डॉ. मठवाले यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचविण्यावर भर देत गुणवत्तापूर्ण सेवा देण्याचे आवाहन केले. कामात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि वेळेचे नियोजन राखून विभागाची कार्यक्षमता अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

बैठकीदरम्यान अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक तसेच प्रशासकीय अडचणी जाणून घेऊन त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात आले. तसेच शासनाच्या AEBAS (Aadhaar Enabled Biometric Attendance System) अंतर्गत सर्व संबंधितांची बायोमेट्रिक नोंदणी प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली.

यावेळी पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. आधुनिक चारा उत्पादन वाढवून जनावरांचे पोषण सुधारावे, पशुधन विकासाला चालना द्यावी आणि शासनाच्या विविध योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपायुक्तांनी उपस्थित पशुपालकांना केले.

या आढावा बैठकीस सहाय्यक आयुक्त डॉ. प्रदीप गावंडे, पशुवैद्यकीय अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकारात्मक वातावरणात पार पडलेल्या या बैठकीत विभागाच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. सहभोजनाने बैठकीची सांगता झाली.

ठळक मुद्दे

  • ✔️ सर्व योजनांचा सविस्तर आढावा
  • ✔️ १०० टक्के उद्दिष्टपूर्तीवर भर
  • ✔️ AEBAS बायोमेट्रिक नोंदणी पूर्ण
  • ✔️ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या तत्काळ निकाली
  • ✔️ पशुपालकांना वैरण बियाण्यांचे वाटप
  • ✔️ पशुधन विकासासाठी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

About The Author

error: Content is protected !!