September 1, 2026

‘मेरा युवा भारत’ विशेष नोंदणी व जनजागृती अभियानाला गडचिरोलीत प्रारंभ

“१५ ऑगस्टपर्यंत जिल्हाभर नोंदणी शिबिरे; स्वयंसेवा, कौशल्य विकास व नेतृत्व विकासासाठी युवकांना मोठी संधी”

गडचिरोली, ५ जुलै : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत ‘मेरा युवा भारत (MY Bharat)’ गडचिरोली कार्यालयाच्या वतीने १ जुलै ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीत जिल्हाभर विशेष नोंदणी व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यातील अधिकाधिक युवक-युवतींना ‘मेरा युवा भारत’ या राष्ट्रीय डिजिटल व्यासपीठाशी जोडून स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, सामाजिक सहभाग आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या विशेष अभियानांतर्गत जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायती, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून विशेष नोंदणी शिबिरे, जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे आणि डिजिटल नोंदणी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या माध्यमातून युवकांना ‘मेरा युवा भारत’ पोर्टलचे महत्त्व, ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया आणि त्यावरील विविध सुविधा व संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.

‘मेरा युवा भारत (MY Bharat)’ हे केंद्र शासनाचे युवकांसाठी विकसित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण डिजिटल व्यासपीठ असून, देशातील युवकांना स्वयंसेवा, कौशल्य विकास, नेतृत्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रीय एकात्मता तसेच विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रमांशी जोडण्याचे काम या माध्यमातून केले जाते. या पोर्टलवर नोंदणी केलेल्या युवकांना विविध स्वयंसेवी उपक्रम, प्रशिक्षण कार्यक्रम, इंटर्नशिप, जनजागृती अभियान आणि राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध होते. यामुळे युवकांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह त्यांच्या नेतृत्वगुणांना चालना मिळण्यास मदत होते.

अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, ग्रामपंचायती, स्वयंसेवी संस्था आणि संबंधित शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवून अधिकाधिक युवक-युवतींची नोंदणी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ‘मेरा युवा भारत’ गडचिरोली कार्यालयाने केले आहे.

जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी या अभियानाचा लाभ घेऊन ‘मेरा युवा भारत’ पोर्टलवर नोंदणी करून विविध विकासात्मक आणि राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीसाठी www.mybharat.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येणार असून, जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष नोंदणी शिबिरांमध्येही ऑन-द-स्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहणार आहे.

युवकांचा सर्वांगीण विकास, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!