July 5, 2026

कपडे वाळविताना विजेचा धक्का; टेकडीटोला येथील ४५ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू

“अर्थिंगच्या तारेला हात लागताच दुर्घटना; कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनी केले मृत घोषित”

कुरखेडा | ५ जुलै २०२६ : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली ग्रामपंचायतअंतर्गत टेकडीटोला येथे रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत विजेचा धक्का बसल्याने एका ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. प्रभा दिनकर मडकाम (वय ४५) असे मृत महिलेचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रभा मडकाम या नेहमीप्रमाणे घरातील कपडे धुऊन घराशेजारी असलेल्या सार्वजनिक वीज खांबाच्या अर्थिंगला बांधलेल्या तारावर कपडे वाळवित होत्या. याचवेळी अचानक त्या तारेमध्ये विद्युतप्रवाह आल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्या जागीच गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी तातडीने त्यांना चारचाकी वाहनाने उपजिल्हा रुग्णालय, कुरखेडा येथे दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार असून, कुटुंबातील एकमेव महिला सदस्य गमावल्याने संपूर्ण कुटुंब शोकाकुल झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणी कुरखेडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) करण्यात आली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

रखडलेल्या महामार्गामुळे नातेवाईकांची पायपीट

घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नेतानाही नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. कुरखेडा येथील रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे वाहन शवविच्छेदन गृहापर्यंत पोहोचू शकले नाही. परिणामी, नातेवाईकांना मृतदेह सुमारे ५०० मीटर खांद्यावरून पायी न्यावा लागला. शवविच्छेदनानंतरही मुख्य रस्त्यापर्यंत मृतदेह अशाच पद्धतीने आणावा लागल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

About The Author

error: Content is protected !!