July 5, 2026

“मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोफत हृदय तपासणी शिबिर; ३०० हून अधिक बालकांची तपासणी, गरजूंना मोफत शस्त्रक्रियेची हमी”

गडचिरोली | प्रतिनिधी | ५ जुलै : गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासीबहुल जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हृदयरोग निदान आणि मोफत उपचारांची संधी उपलब्ध करून देणाऱ्या मोफत 2D Echo व बाल हृदय तपासणी शिबिराला रविवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे झालेल्या या उपक्रमात ३०० हून अधिक बालकांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली असून, शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवरही पूर्णपणे मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. लोकप्रतिनिधी, आरोग्य विभाग, सामाजिक संस्था आणि तज्ज्ञ डॉक्टर यांच्या संयुक्त प्रयत्नातून अशा सेवाभावी उपक्रमांना सातत्य मिळावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमात सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकरतसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेत बालआरोग्य सेवांना अधिक बळकटी देण्याचा निर्धार व्यक्त केला.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, दुर्गम भागातील बालकांमध्ये जन्मजात हृदयविकारांचे वेळेत निदान करून त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग कटिबद्ध आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष, ज्युपिटर हॉस्पिटल आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने गरजू बालकांना तपासणीपासून शस्त्रक्रियेपर्यंत सर्व सेवा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूचे विशेष कौतुक करत, गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात येऊन सेवा देणे ही समाजसेवेची प्रेरणादायी भावना असल्याचे नमूद केले.

३०० बालकांची तपासणी; अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग आणि त्यांच्या चमूने ० ते १८ वर्षे वयोगटातील ३०० हून अधिक बालकांची अत्याधुनिक 2D Echo तंत्रज्ञानाद्वारे तपासणी केली. या तपासणीत जन्मजात हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे विकार तसेच रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे निदान करण्यात आले. पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

अन्विकाची यशोगाथा ठरली प्रेरणादायी

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अहेरी तालुक्यातील दोन वर्षीय अन्विका सूरज गौरकर हिच्या उपचाराची यशोगाथा कार्यक्रमात सादर करण्यात आली. अंगणवाडी स्तरावरील नियमित तपासणीत तिच्या हृदयातील जन्मजात दोष वेळेत निदर्शनास आला. आता तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया आणि उपचार शासनाच्या माध्यमातून पूर्णपणे मोफत करण्यात येणार आहेत. तिची कहाणी उपस्थितांसाठी आशेचा किरण ठरली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे उपस्थित होते. मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, समन्वयक डॉ. सौरभ अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शेटे, संदीप ठाकूर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, आरबीएसके समन्वयक प्रशांत खोब्रागडे तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!